spot_img
spot_img
spot_img

‘दुबईमित्र’ सोमनाथ पाटील यांचा हृद्य सत्कार

पुणे – गेल्या काही वर्षांत मराठीजनांचे, विशेषतः पुणेकरांचे दुबईतील चैतन्यशील मित्र, साहित्य, संस्कृती, नाट्य, संगीत, चित्रपट कलावंत आणि राजकीय व्यक्तींचे स्नेही, दुबईसह बेळगाव आणि परिसरातील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सोमनाथ पाटील यांचा हृद्य सत्कार आणि स्नेहमेळावा रविवारी (ता.८) पुण्यात पार पडला. दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीमधील त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

दुबई सरकारमध्ये ३७ वर्षे उच्चपदावर असलेल्या पाटील यांच्या पुण्यातील मित्र परिवाराच्या वतीने हा अनौपचारिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते प्रवीण तरडे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. सहकार बँकींगतज्ज्ञ आणि राज्य सरकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, संवाद संस्थेचे सुनील महाजन, ज्येष्ठ उद्योजक कल्याण तावरे, उद्योजक समीर लडकत, युवराज शहा, ‘मानकर डोसा’चे संतोष मोरे, पीसीईटी चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, ‘एमईडीसी’चे उपाध्यक्ष सचिन ईटकर, खानापूर-बेळगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष पीटर डिसूझा, निवृत्त ब्रिगेडियर किशोर जाधव, पिंपरीतील प्रसिद्ध सर्जन डॉ. शहाजी चव्हाण, डॉ. सतीश जगताप, मिलिंद कुलकर्णी, श्री कैलास केंजळे आणि श्री रणजित देशमुख हे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.यांच्यासह पुण्यात अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मा. डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डी. वाय. पाटील विद्यापीठ, श्री अशोक विखे पाटील, अध्यक्ष, विखे पाटील फाउंडेशन, श्री शिवाजीराव कदम, कुलपती, भारती विद्यापीठ, या मान्यवरांनी आभासी माध्यमातून शुभेच्छा दिल्या: श्री. पाटील यांच्या गौरवार्थ सर्वच मान्यवर वक्त्यांनी केलेल्या भाषणांत सोमनाथ पाटील यांचे व्यक्तिमत्त्व उलडगत गेले. त्यांच्या पत्नी सौ. शालन पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
एकेकाळी पर्शियाच्या आखातामधील हे छोटं खेडेगाव असलेलं दुबई आज श्रीमंती मिरवणारं जगप्रसिद्ध शहर बनलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, वाळवंटात भव्यदिव्य शहर वसण्याचं स्वप्न तिथल्या राज्यकर्त्यांनी विसाव्या शतकात पूर्णत्वाला येत गेलं. हे शहर वसवण्यात असंख्य भारतीयांचा वाटा फार मोठा आहे. त्यांच्या मेहनतीतून, सर्जनातून दुबईचा कायापालट झाला. श्री. पाटील त्यापैकी एक. बेळगावजवळच्या छोट्या गावातून ऐंशीच्या दशकात शारजाह आणि नंतर दुबईत बांधकाम अभियंता म्हणून गेलेले सोमनाथ पाटील तिथल्या सरकारमध्ये इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर विभागाचे व्यवस्थापक आणि प्रकल्प सल्लागार बनले. गेली तब्बल ३७ वर्षे ते या अत्याधुनिक आणि जगातील महत्त्वांच्या शहरांपैकी एक असलेल्या दुबईच्या विकासाचे साक्षीदार आणि भागीदार आहेत. दुबईनं पाटील यांना भरभरुन प्रेम दिलं. तिथल्या राजांचे अर्थात राज्यकर्त्यांचे ते आवडते बनले. दुबई सरकारचे अनेक उपक्रम सोमनाथ पाटील यांनी यशस्वी केले. त्यांना संयुक्त अरब अमिराती सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

मराठीजनांच्या प्रेमाचे धनी

दुबई जसजशी प्रसिद्धीला आली तसे भारतीयांची आणि मराठीजनांची पावले या शहराकडे वळली. गेल्या काही वर्षांच्या काळात सोमनाथ पाटील मराठीजनांचे दुबईतील ते जणू आधारस्तंभ बनले. आपल्या निर्मळ, आल्हाददायक व तितक्याच बोलक्या व प्रेमळ स्वभावामुळे ते मराठी मनाच्या हार्दिक प्रेमाचे धनी बनले आहेत. खानापूर जवळील एका गावातील प्राथमिक शिक्षक स्व. जायाप्पा पाटील व अनसुया पाटील यांचे ते पुत्र. आपल्या सुमारे चार दशकांचा दुबईतील जीवनप्रवास कथन करताना सोमनाथ पाटील यांनी घरची प्रतिकूल परिस्थिती, पोटासाठी बेळगावहून मुंबईत आल्यानंतर व तिथून दुबईत गेल्यानंतरचे अनुभव कथन केले. या शहराविषयी आणि तिथं त्यांना स्थिरस्थावर करण्यास मदत करणाऱ्या राज्यकर्त्यांबद्दल बोलताना त्यांना अनेकदा गहिवरून येत होतं. सत्काराला उत्तर देताना त्यांनी मराठीजनांना दुबईत हरप्रकारे मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

सोमनाथ पाटील यांनी एक हृद्य आठवण याळी सांगितली. लहानपणी क्रिकेटचे सामने बघण्यासाठी दुसऱ्याच्या घरी जात. शारजाह इथे नोकरीनिमित्त गेल्यावर शारजाह क्रिकेट मैदान उभं करण्यात त्यांनी वाटा उचलला. या मैदानावर श्री. पाटील यांना शारजाह क्रिकेट सिरीज मॅनेजमेंट टीमचे सदस्य म्हणून काम करता आले. चंदू बोर्डे, कपील देव, वेंगसरकर आदी भारतीय क्रिकेटपटूंसह विवियन रिचर्ड्स आदी अनेक क्रिकेटपटूंशी त्यांचा स्नेह जुळला.

जितेंद्र भुरुक यांनी श्री. पाटील यांच्यासाठी विशेष गीत गायले. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन संस्थेचे जमीर मुल्ला आणि आयकॉनिक अल्फासचे प्रिया माने यांनी या समारंभ यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!