spot_img
spot_img
spot_img

’जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शबनम न्यूज | प्रतिनिधी
जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर आधारीत स्मार्ट मशिन्सच्या उत्पादनात पुढाकार घ्यावा आणि असे तंत्रज्ञान महाराष्ट्रात तयार करून जगात निर्यात करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिरुर औद्योगिक वसाहत क्षेत्रात जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधिक्षक संदीप गिल, राजेश सिन्हा, मुकुल वासने, देवेंद्र बहीरट आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रासह भारत आणि पूर्ण जगात जॉन डिअरने आपले मूल्य कायम ठेवत प्रगती साधली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हवामान बदलाल्या काळात कृषी क्षेत्रावर परिणाम होत आहे. जॉन डिअरसारख्या उद्योगसंस्था नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून चांगले कार्य करीत आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचा कृषी क्षेत्रातही उपयोग सुरू झाला असून कृषी प्रक्रीयेत अनुकूल बदल घडवून उत्पादनात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत आहे. कृषी क्षेत्रात त्यामुळे खूप चांगले बदल घडून येतील.
नुकत्याच पुणे येथे झालेल्या कृषी हॅकॅथॉनमध्ये अनेक चांगल्या कल्पनापुढे आल्या. या कल्पनांना उत्पादनात बदलून ही उन्नत तंत्रज्ञानाची क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता जॉन डिअरमध्ये आहे. उद्योगसंस्थेला बाजारातील महत्व कायम ठेवण्यासाठी नाविन्याचा शोध घ्यावा लागतो आणि जॉन डिअर त्यात आघाडीवर आहे. जॉन डिअरने स्मार्ट मशिन्सची ही क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि स्मार्ट मशिन्स इथे तयार करून जगात निर्यात करावेत. महाराष्ट्रात संस्थेच्या विस्तारात राज्य शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली..
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ७० टक्के महिलांना रोजगार देण्याच्या धोरणामुळे जॉन डिअर संस्था यशस्वी ठरत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’, ‘डिझाईन इन इंडीया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या तिन्ही गोष्टी जॉन डिअर इंडियाने अनुसरल्या आहेत. राज्यातून ९ देशात निर्यात केली जात आहे. संस्थेचा ८० टक्के महसूल हा निर्यातीतून मिळत आहे. डिझाईनींगच्या क्षेत्रात भारतात त्यासाठी आवश्यक गुणवत्ता उपलब्ध आहे. जॉन डिअरकडून उत्पादनाचे डिझाईनींग आणि प्रमाणिकरण इथे होत आहे. या दोन बाबी प्रत्येक उद्योगासाठी महत्वाच्या आहेत. संस्था या दोन्ही गोष्टी इथेच करीत असल्याने ती खऱ्या अर्थाने भारतीय आणि महाराष्ट्रातील संस्था आहे.
जॉन डिअरकडून शेतकऱ्यांसाठी चांगले तंत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. अन्य क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्रात उन्नत तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची जास्त गरज आहे. यामुळे शेतीच्या परंपरागत पद्धतीच्या कामात बदल होईल, शेतीच्या कामात अधिक अचूकता येईल आणि हे तंत्रज्ञान उत्पादन, उत्पादकता यावर परिणाम करणारे असेल. आणि जॉन डिअर इंडियाच्या केंद्रस्थानी याच बाबी आहेत. पेरणीपासून कापणी पश्चात कृषी प्रक्रीयेपर्यत संपूर्ण कृषीकार्यात जॉन डिअरने चांगले तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणले.
राजेश सिन्हा यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची माहिती दिली. महाराष्ट्रात उद्योगांसाठी चांगले वातावरण असल्याने जॉन डिअर इंडियाने राज्यात पाचवी मोठी गुंतवणूक केली आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून चांगले उत्पादन करण्यात शेतकऱ्यांना नव्या प्रकल्पामुळे मदत होणार आहे. गेल्या सात वर्षात कृषी आणि रस्ते निर्माण क्षेत्रात जॉन डिअरने भारतात योगदान दिले आहे. पुणे येथे होणारे उत्पादन पुर्णत: भारतात निर्मित असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जॉन डिअर इंडियाच्या नव्या प्रकल्पाची पाहणी केली आणि माहिती घेतली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!