महानगरपालिकेच्या वतीने सुधारित विकास योजनेच्या प्रारूप आराखड्यात थेरगाव भागात 24 मीटर रुंदीचा रस्ता करण्याचे नियोजन केले आहे. तो रस्ता करण्यास थेरगाव परिसरातील शेकडो नागरिकांनी आक्षेप घेत हरकत नोंदविली आहे.
थेरगाव भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे तेथे 25 ते 30 वर्षापासून अनेक नागरिक घर बांधून राहत आहेत थेरगाव परिसरातील सर्वे क्रमांक सात, आठ, दहा, अकरा पडवळ नगर ते जय मल्हार नगर या भागात डीपी नुसार 24 मीटर रुंद रस्ता विकसित करण्यात येणार आहे. तो रस्ता डीपी आराखड्याच्या नकाशात दर्शविण्यात आला आहे. दाट लोकवस्ती झाल्याने त्या रस्त्यांची गरज नसून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर बुलडोजर चालणार आहे. अनेक लोक बेघर होणार आहेत. त्यामुळे प्रस्तावित डीपी रस्ता रद्द करावा असा आक्षेप घेत शेकडो नागरिकांनी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे हरकती नोंदविल्या आहेत. तसेच थेरगाव परिसरातून रिंग रोड मार्ग दाखविण्यात आला आहे. अनेक वर्षापासून रखडलेला रिंग रोड प्रकल्प ही रद्द करावा अशी मागणी थेरगावकरांनी केली आहे.