spot_img
spot_img
spot_img

सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनी साधला महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद

  • महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी ”आता थांबायचं नाय” या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘’आता थांबायचं नाय’’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करून पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांना प्रेरणा देण्याचे तसेच त्यांच्यामध्ये शिक्षणाचे महत्व रूजविण्याचे जे काम केले आहे ते कौतुकास्पद असून शिक्षणासाठी झगडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल असे गौरवद्गार सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भरत जाधव यांनी काढले.

पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता व मानसिक आरोग्याच्या वाढीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. अशाच एका उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सफाई सेवकांसाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी मराठी चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आज पिंपरी येथील विशाल सिनेमा येथे आयोजित करण्यात आले होते.

या विशेष कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड यांच्यासह विशाल थिएटरचे संचालक वसंत पिंपळे, विशाल पिंपळे, युवराज पिंपळे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

अभिनेते भरत जाधव म्हणाले, शहर स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी मानून सफाई सेवक पहाटेपासून शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी पार पाडतात. स्वच्छतेचे रिअल हिरो ते आहेत, मी तर केवळ भूमिका पार पाडली. ‘’आता थांबायचं नाय’’ हा केवळ एक चित्रपट नाही, तो सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची गोष्ट आहे. शिक्षण ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे मग तो अधिकारी असो की सफाई कामगार हा संदेश या चित्रपटाच्या माध्मातून देण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणासाठी झगडणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कहाणी मला भावली. त्यांच्या जिद्दीला सलाम करत अशी प्रेरणादायी सत्यकथा सगळ्यांसमोर मांडणे ही कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे असे मला वाटले आणि संपुर्ण महाराष्ट्रात सध्या हा चित्रपट गाजतो आहे. विशेषत: पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेऊन सफाई कर्मचाऱ्यांना हा चित्रपट दाखवला ही बाब कौतुकास्पद आहे.

उप आयुक्त सचिन पवार म्हणाले, सफाई सेवकांच्या दैनंदिन संघर्ष, अडचणी आणि अनुभवांवर आधारित असलेल्या “आता थांबायचं नाय” चित्रपटामध्ये त्यांचे कार्य समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कलाकृती सफाई कामगारांच्या मेहनतीची आणि योगदानाची दखल घेणारी आहे. त्यांच्या कामाबद्दल समाजामध्ये आदर व जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट या स्क्रीनिंगमागे आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या निर्देशानुसार अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच पिंपरी चिंचवडमध्ये राबविला जात आहे. सफाई सेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, कामाबाबत सजगता वाढवणे व त्यांच्या कार्याला प्रेरणा देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे सफाई सेवकांनाही त्यांच्या कार्याचा अभिमान वाटेल, आणि अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

दरम्यान, यावेळी सर्व उपस्थितांनी अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेतली.

चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट ह्रदयस्पर्शी असल्याचे मत आणि समाधान सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आणि अभिनेते भरत जाधव यांचे देखील अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पवार यांनी, सुत्रसंचालन आणि स्वच्छता शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर अण्णा बोदडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!