शबनम न्यूज | प्रतिनिधी
कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यातील अमृत स्नानाचे दिवसही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
साधू-महंतांच्या उपास्थितीत कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा होणे ही खऱ्या अर्थाने कुंभपर्वाची सुरूवात आहे, असे नमूद करू मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्याचे संचलन आखाडे, साधू -महंत करतात, राज्य शासन सेवक म्हणून अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करते. यावेळी देखील शासनातर्फे उत्तम सुविधा उभारण्यात येतील. कुंभमेळ्याबाबत साधू महं तांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. २०१५ मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता. यावेळी पूर्व तयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत आहे.
गोदावरी निर्मळ राहावी आणि कायम प्रवाही राहावी हेच कुंभचे उद्दिष्ट असून तसा शासनाचा प्रयत्न आहे. गोदावरीचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी उपायोजना करण्यात येत आहेत. गोदावरीत जाणारे पाणी स्वच्छ असावे यादृष्टीने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येत आहेत. नदी पात्रात अशुद्ध पाणी जाऊ नये असे प्रयत्न करण्यात येतील. नदी प्रवाहित राहिल्यास शुद्ध राहील, त्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे कुंभ आणि त्यानंतरही गोदावरीचे जल निर्मळ राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.