spot_img
spot_img
spot_img

श्री मंगलमूर्तींच्या ज्येष्ठी यात्रेचे चिंचवड येथून नारंगी कडे प्रस्थान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्रीमंगलमूर्तीची ज्येष्ठी यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात प्रारंभ झाली. यंदाही मोठ्या भक्तसमुदायाच्या उपस्थितीत तिचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा ३१ मे रोजी चिंचवड येथे परतणार आहे.

यावर्षीही, चिंचवड येथील श्री मंगलमूर्ती वाडा येथून ज्येष्ठी यात्रेस भव्य सुरुवात झाली. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, तसेच विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप उपस्थित होते. या सोहळ्यात हजारो भक्तांनी सहभागी होत श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तीचे दर्शन घेतले.

श्री मंगलमूर्तींचे रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारंगी येथे श्री मोरया गोसावी महाराज यांनी प्रतिष्ठापित केलेले श्री गणेश व हनुमान मंदिर आहे. त्या ठिकाणी जेष्ठ महिन्यात यात्रेसाठी चिंचवड येथून मंगलमूर्ती जातात अशी परंपरा आहे.

मंगलमूर्तींच्या ज्येष्ठ यात्रेचे श्रीक्षेत्र नारंगी येथे आगमन झाले, त्यावेळी नारंगी गावातील समस्त ग्रामस्त यांनी श्रींची मिरवणूक काढली, याच्या मध्यभागी श्री मंदार महाराज देव यांनी महासाधू श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्ती गळ्यात धारण केले होते.

त्यांच्या पुढे सर्व गावकऱ्यांनी भजने म्हणत श्रींची गावातून प्रदक्षिणा केली. ठिकठिकाणी सुवासिनींनी श्रींना ओवाळले, त्यावेळी गावात उत्साहाचे व धार्मिक वातावरण होते.

महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री गणेश व हनुमान मंदिरात श्रींचा मुक्काम असणार आहे.

यात्रेचा पुढील कार्यक्रम:

यात्रेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे:
गुरुवार, ता. ३०: रोजी नारंगी येथे सकाळी श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तन होईल. रात्री ८ वाजता महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या परंपरेतील २१ पदांची धुपारती होईल.

शुक्रवार, ता. ३१: नारंगी येथे गणेश जयंतीचे पारणे होईल तसेच महाप्रसाद होईल. यानंतर श्री मंगलमूर्तींचे श्री क्षेत्र चिंचवड कडे प्रस्थान होईल.

३१ मे रोजी पारंपरिक धुपारतीने चिंचवड येथे यात्रेचा समारोप होईल.

भक्तांसाठी आवाहन

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व भक्तगणांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भक्तिमय आणि ऐतिहासिक पालखी सोहळ्यात सहभागी होऊन श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त मंगलमूर्तीचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी लाभावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!