spot_img
spot_img
spot_img

प्रशासनाने व नागरिकांनी सतर्क राहावे – भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे


आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन

पिंपरी चिंचवड, दि. २७ मे, २०२५: राज्यात सध्या पिंपरी चिंचवडसह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, भाजप शहराध्यक्ष  शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाला सतर्क राहण्याचे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आवाहन केले आहे.

शत्रुघ्न काटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे, जसे की अग्निशमन उपकरणे, बचाव उपकरणे, वैद्यकीय किट इत्यादी सुस्थितीत आणि कार्यक्षम असल्याची खात्री करावी. तसेच, आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि दक्ष राहण्याची सूचना करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

प्रशासनाने आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आवश्यकतेनुसार साहाय्य व बचावकार्य तत्परतेने पार पाडावे. पाण्याने भरलेले रस्ते, पुलांची स्थिती आणि विजेच्या तारांवर विशेष लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

आपत्तीच्या वेळी लोकांना त्वरित मदत करण्यासाठी हॉटलाइन आणि सोशल मीडियासारखे संपर्क साधण्याचे मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणीही काटे यांनी केली आहे.

प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर आहे; मात्र नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे काम अत्यंत महत्त्वाचे असून, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!