शबनम न्यूज | प्रतिनिधी
तेहरान (इराण) येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस १५-के स्पर्धेत भारताच्या अथर्व शर्मा (पुणे) व मान केसरवानी (लखनऊ) या जोडीने पुरुष दुहेरीचे उपविजेतेपद जिंकले. या स्पर्धेत अथर्व शर्माने मान केसरवानीच्या साथीत चमकदार कामगिरी करत व्हेनेझुएलाच्या जुआन जोश बियांची व ब्रॅंडन पेरेज यांना पराभूत करत अंतिम फेरी गाठली. मात्र, स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांना भारताच्याच प्रज्वल देव आणि नितीनकुमार सिंह या जोडीकडून ३-६, ६-७ (३-७) असा पराभव स्वीकारावा लागला. एक तास ३० मिनिटे चाललेल्या या सामन्यात दोन्ही सेटमध्ये अथर्व व मान जोडीला वर्चस्व मिळवता आले नाही.
सुरुवातीला उत्तम सर्व्हिस करत या जोडीने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रज्वल-नितीनकुमार जोडीने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत गुणांमध्ये आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत अथर्व व मान यांना तोडता आली. संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करूनही अंतिम सामन्यात दोन्ही सेटमध्ये पिछाडीवर पडल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, जागतिक क्रमवारीत ५०० आतमध्ये असलेल्या जुआन-ब्रॅंडन जोडगोळीला अथर्व व मान या जोडीने पराभूत केले होते. सध्या अथर्व १६००, तर मान १००० व्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुष गटात अथर्वची ही पहिलीच अंतिम फेरी होती. आता अथर्व उझबेकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अथर्व शर्मा म्हणाला, “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. ही आमची पहिलीच अंतिम फेरी असून, माझे आणि मानचे एकत्र खेळणे हेदेखील पहिल्यांदाच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष दुहेरीत माझी ही पहिलीच अंतिम फेरी असून, ती गाठल्याचा खूप आनंद होतोय. येत्या काही आठवड्यांत उझबेकिस्तानमध्येही मानसोबतच हे यश पुढे नेत राहायला आवडेल. या प्रवासात आम्हाला कुटुंबीय, प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन व मोलाची साथ लाभली.”