शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘अष्टपदी’ हा मराठी चित्रपट ३० मे रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शित झालेला ‘अष्टपदी’चा टिझर, ट्रेलर आणि गीत-संगीताने या चित्रपटाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचवण्याचे काम केले. प्रेमाच्या गुलाबी नात्याचे आजवर कधीही न उलगडलेले पैलू ‘अष्टपदी’च्या निमित्ताने रसिकांसमोर सादर होणार आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘अष्टपदी’च्या रूपात रसिकांना एक संगीतप्रधान कौटुंबिक कलाकृती पाहायला मिळणार आहे.
महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्माते उत्कर्ष जैन यांनीच ‘अष्टपदी’चे दिग्दर्शनही केले आहे. कथा, पटकथा व संवादलेखन क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी केलं आहे. आशयघन कथेवर लिहिण्यात आलेली नाट्यमय वळणांची पटकथा या चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान आहे. आजच्या तरुणाईपासून अबालवृद्धांना आवडतील असे अर्थपूर्ण संवाद आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम ‘अष्टपदी’चे वैशिष्ट्य आहे. कथानकातील प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी कलाकारांची केलेली अचूक निवड, दिग्दर्शकाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत कलाकारांनी घेतलेली मेहनत, दिग्दर्शकाचे प्रयोगशील सादरीकरण, सुमधूर गीत-संगीत आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये अशा एक ना अनेक कारणांमुळे हा चित्रपट रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. खऱ्या प्रेमाची आजवर कधीही न समोर आलेली व्याख्या या चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांसमोर येणार आहे. प्रेम म्हणजे केवळ दोन जीवांचा विचार नव्हे, तर त्याहीपलिकडे प्रेम आणि नातेसंबंधांचे आकाश खूप मोठे आहे. त्याच अवकाशाचा वेध या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांनी घेतला आहे.
आजच्या समाजातील घटकांचे प्रतिबिंब मोठ्या पडद्यावर दाखवण्याचे काम ‘अष्टपदी’ करणार असल्याचे दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांचे म्हणणे आहे. हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी आणि कागदावर उतरवलेले पडद्यावर सादर करण्यासाठी ‘अष्टपदी’च्या टिममधील सर्वच लहान-मोठ्या घटकाने खूप मेहनत घेतली असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘अष्टपदी’ या चित्रपटाला जर आर्थिक यश लाभलं तर त्यातील काही भाग राष्ट्रीय संरक्षण निधीला देणार असल्याचे उत्कर्ष जैन यांनी सांगितले.
आजच्या काळातील नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट म्हणजे सर्वतोपरी मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे ‘अष्टपदी’ पाहताना रसिकांना जाणवेल. या चित्रपटात संतोष जुवेकर, मयुरी कापडणे, अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर , विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, विशाल अर्जुन, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे हे कलाकार विविध व्यक्तिरेखांमध्ये झळकणार आहेत. गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतरचनांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी सुमधूर स्वरसाज चढवला आहे. मिलिंद मोरे यांनीच या चित्रपटाला पार्श्वसंगीतही दिलं असून, कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांनी केलं आहे. रंगभूषा अतुल शिधये यांनी, तर वेशभूषा अंजली खोब्रेकर व स्वप्ना राऊत यांनी केली आहे. डिओपी धनराज वाघ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केले आहे. अजय खाडे ‘अष्टपदी’चे कार्यकारी निर्माते आहेत, तर राहुल पाटील आणि नंदू आचरेकर सहदिग्दर्शक आहेत.