शबनम न्यूज | प्रतिनिधी
सासरच्या छळाला कंटाळून राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. तिचा हुंड्यासाठी सासरकडच्या मंडळींकडून छळ केला जात होता, असा आरोप वैष्णवीच्या पालकांनी केला आहे. तिच्या सासरच्या मंडळी सासू, नणंद, नवरा यास अटक करण्यात आली आहे, मात्र सासरा राजेंद्र हगवणे अजूनही फरार आहे. दरम्यान आज वैष्णवीचे १० महिन्याचे बाळ तिच्या पालकांना सोपविले गेले. बाळाला पाहून कस्पटे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.
दहा महिन्यांचे बाळ आमच्याकडे आले अन् जणू आमची वैष्णवीच आमच्या घरी परतली आहे, अशी भावना वैष्णवीची आई स्वाती कस्पटे यांनी व्यक्त केली. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर वैष्णवीचा १० महिने वयाचा जनकराजे हा चिमुरडा मुलगा आईपासून पोरका झाला. वैष्णवीचे बाळ हे एका त्रयस्थ व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामाने केला होता. वैष्णवीचे बाळ आमच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी वैष्णवीच्या आईवडिलांनी केली होती. त्यानंतर तातडीने बाळाला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
कस्पटे कुटुंबीय याबाबत म्हणाले, ‘‘आम्हाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. तुम्ही ज्या बाळाच्या शोधात आहात ते माझ्याकडे आहे, मला ते तुम्हाला द्यायचे आहे, असे अज्ञात व्यक्तीने फोनवरून संगितले. बाळ घेण्यासाठी बाणेर येथे महामार्गावर बोलवले. तिथे गेल्यावर अज्ञात व्यक्तीने बाळ आमच्या ताब्यात दिले. आता आम्हाला खूप आनंद होतोय. बाळ आता आमच्याकडे सुखरूप आहे. त्याला आम्ही आयुष्यभर सांभाळणार आहोत, असे बाळाचे आजोबा आनंद उर्फ अनिल कस्पटे यांनी सांगितले.