शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या केली आहे. तिचा हुंड्यासाठी सासरकडच्या मंडळींकडून छळ केला जात होता असा आरोप वैष्णवीच्या पालकांनी केला आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई- वडीलांशी फोन द्वारे संवाद साधला. संवाद साधत असताना अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई- वडिलांशी फोनद्वारे संवाद साधला. तसेच वैष्णवीच्या सासरकडच्या मंडळींवर कौटुंबिक हिंसाचाराचेही आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीका होत आहे. यावर आज पहिल्यांदाच अजित पवारांनी भाष्य केलं. तसेच त्यांनी राजेंद्र हगवणेंवरील संताप व्यक्त केला.
पवार म्हणाले, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. उलट मला कळाल्यानंतर त्या आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोका असं पोलिसांना सांगितलं. आरोपीला शोधण्यासाठी तीन टीम लावल्या होत्या, आणखी तीन टीम वाढवायला सांगितल्या आहेत. सगळी कलम लावण्यास सांगितले आहेत. त्याला सोडणार नाही. एकीकडे प्रेम विवाह करतात आणि दुसरीकडे असे वागतात हरामखोर आहेत. मी तुमच्यासोबत आहे. तुमच्या मुलीच्या बाजूने आहे. असा विश्वास यावेळी अजित पवारांनी व्यक्त केला.