शबनम न्यूज | पुणे
आदिवासी विभागाने आश्रम शाळांमध्ये शिक्षकांच्या १७९१ मंजूर पदांची सेवा बाह्यस्रोतांद्वारे (कंत्राटी) उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी ८४ कोटी ७४ लाख ५५ हजार रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. १६ नोव्हेंबर २०२२च्या निर्णयाद्वारे आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. या सुधारित आकृतिबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांच्या मंजूर १७९१ पदांच्या सेवा बाह्यस्रोतांद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी जीईएम संकेतस्थळावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
बाह्यस्रोतांद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या शिक्षकांमध्ये २२९ उच्च माध्यमिक शिक्षक, ४५५ माध्यमिक शिक्षक, १२० पदवीधर प्राथमिक शिक्षक, १७८ प्राथमिक शिक्षक इंग्रजी, ८०९ प्राथमिक शिक्षक मराठी यांचा समावेश असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.