spot_img
spot_img
spot_img

भव्य, ऐतिहासिक, बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार!

जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषा आणि त्याचबरोबर जगभरात देखील प्रदर्शित होईल, आणि याच निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अतुलनीय शौर्यगाथा भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या अभिमानाचा, नाट्यमय कथेचा आणि उत्कृष्ट निर्मितीचा संगम ठरणार आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

जागतिक स्तरावर प्रादेशिक चित्रपटांची ताकद आणि क्षमता दाखवणारा हा चित्रपट नक्कीच एक मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा आहे.

‘राजा शिवाजी’ ही त्या युगाची कथा आहे जेव्हा साम्राज्ये एकमेकांशी भिडत होती, पण सामान्य जनतेला मात्र त्यांच्या अन्यायाची झळ सोसावी लागत होती. आणि याच काळात या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, एका असामान्य अश्या योद्ध्याने, भारतातील शक्तिशाली सत्तेविरुद्ध बंड करून ‘स्वराज्य‘ या संकल्पनेची पायाभरणी केली. ‘राजा शिवाजी‘ हा चित्रपट या संघर्षाचा, शौर्याचा अद्भुत अनुभव देईल असा विश्वास आहे.

सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत, तर आपल्या संगीताने भारतीय चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबई आणि वाई येथे सुरू आहे.

ज्योती देशपांडे, अध्यक्ष – जिओ स्टुडिओज् (मिडिया आणि कंटेंट बिझनेस – RIL) म्हणाल्या, ” “राजा शिवाजी हा केवळ एक चित्रपट नसून, प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली जाण्याचा एक अभिमानास्पद असा सोहळा आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्याचे सामर्थ्य केवळ अशा व्यक्तीमध्ये असू शकते, ज्याच्या हृदयात या कथेबद्दल निस्सीम आदर आहे. रितेश हेच स्वप्न, जिनिलीयासोबत, उत्कटतेने आणि ध्येयनिष्ठेने साकारत आहे. भारताच्या भूमीत जन्मलेल्या, काही महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हे प्रेरणादायी आणि असामान्य कर्तृत्व, भारतापासून ते जगापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच हा चित्रपट आमच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असून भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकारांच्या साथीने आम्ही सादर करत आहोत.”

दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता रितेश विलासराव देशमुख म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही, तर ते महाराष्ट्राच्याच नाही तर कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात जिवंत असलेली भावना आहे. या अलौकिक व्यक्तिमत्वाची महागाथा मोठ्या पडद्यावर साकारणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज् यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. मला खात्री आहे की, ही प्रेरणादायी कथा प्रत्येक भारतीयाच्या मनावर तितकीच खोलवर जोडली जाईल, जितके आम्ही जोडले गेलो आहोत.”

जिनिलीया देशमुख, निर्माती, मुंबई फिल्म कंपनी म्हणाल्या, “हा चित्रपट म्हणजे अनेक वर्षांची मेहनत, निष्ठा, आणि निस्सीम आदरातून साकारली जाणारी कलाकृती आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट, पिढ्यानपिढ्या अखंड प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या महान राजाला मनापासून दिलेली आदरांजली आहे. आमचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्हाला सक्षम साथ दिल्याबद्दल आम्ही जिओ स्टुडिओजचे मनःपूर्वक आभारी आहोत. ही ऐतिहासिक शौर्यगाथा देशातील आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एक विनम्र प्रयत्न असणार आहे.”

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरात सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!