शबनम न्यूज | पुनावळे
महापालिकेने पुनावळे येथील वन विभागाच्या जागेवर सन २००८ मध्ये टाकलेले कचरा डेपाेचे आरक्षण स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींच्या तीव्र विराेधामुळे रद्द केले आहे. या जागी व्यावसायिक गाळे, कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचे आरक्षण नवीन विकास आराखड्यात टाकण्यात आले आहे.
भविष्याची गरज ओळखून महापालिकेने पुनावळे येथे २००८ मध्ये २२.८ हेक्टर जागेवर कचरा डेपोचे आरक्षण टाकले हाेते. हिंजवडी, पुनावळे, मारुंजी, ताथवडे या गावांच्या मध्यभागी ही वन विभागाची जागा आहे. आरक्षण टाकताना पुनावळे भागात नागरीकरण झाले नव्हते. परंतु, मागील १७ वर्षांत या परिसरात गगनचुंबी इमारती उभारल्या. प्रचंड नागरीकरण झाले.
नैसर्गिक वातावरण, बाजूला असलेली माहिती व तंत्रज्ञाननगरी, शैक्षणिक सुविधांमुळे या भागात राहण्यासाठी पसंती वाढली. परिणामी, एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या झाली. मागील वर्षी महापालिकेने पुनावळेत कचरा डेपो उभारण्यासाठी हालचाली करताच नागरिकांनी तीव्र विरोध सुरू केला. घंटानाद, दुचाकी फेरी, साखळी उपोषण, डेपोच्या जागेवरील झाडांना चिपको आंदोलन केले.तत्कालीन आमदार अश्विनी जगताप यांनीही विधिमंडळात या विरोधात आवाज उठविला. कचरा डेपाेला वाढता विराेध पाहून सरकारने अधिवेशनात डेपाेला स्थगिती दिली. आता नव्याने करण्यात आलेल्या शहर विकास आराखड्यात डेपाेचे आरक्षणच रद्द करण्यात आले आहे.