spot_img
spot_img
spot_img

कॉ. अजित अभ्यंकर, डॉ. संजय नगरकर यांना ‘विश्वबंधुता भूषण पुरस्कार’ जाहीर

शबनम न्यूज | पुणे
विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा ‘विश्वबंधुता भूषण पुरस्कार’ यंदा जेष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर आणि रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांना जाहीर झाला आहे. तिरंगा महावस्त्र, मानपत्र आणि संविधान असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २ जून रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या सातव्या विश्वबंधुता काव्य महोत्सवात या पुरस्काराचे वितरण होईल, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “कामगारांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या अजित अभ्यंकर यांच्या सात साहित्यकृती प्रसिद्ध झालेल्या आहेत, तर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक डॉ. संजय नगरकर यांनी विविध विषयांवर वैचारिक लेखन केले आहे. तसेच त्यांनी दहाव्या विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली हा काव्य महोत्सव आयोजिला आहे.”
“सकाळी दहा वाजता २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सुभाष वारे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. प्रसंगी स्वागताध्यक्ष प्रा. भारती जाधव, निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे आणि प्रा. चंद्रकांत वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुर्के यांच्या अध्यक्षतेखाली ‘जागर विश्वबंधुतेचा’ काव्यसंमेलन होईल. त्यामध्ये राज्यातून आलेल्या २५ नामवंत कवींचा सहभाग राहील. प्रिया माळी (लातूर) यांना ‘राष्ट्रमाता जिजाऊ साहित्य पुरस्कार’, सुनिता कपाळे (संभाजीनगर) यांना ‘त्यागमूर्ती रमाई साहित्य पुरस्कार’ आणि पल्लवी उंबरे (नागपूर) यांना ‘क्रांतीज्योती सावित्री साहित्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल,” असे रोकडे यांनी नमूद केले.

महोत्सवामध्ये सिराज शिकलगार यांच्या ‘गझल प्रकाश’ या गझलसंग्रहाचे, काषाय प्रकाशनच्या ‘भारत विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र’, प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘चंद्राप्रिया’ काव्यसंग्रहाचे आणि नंदा कोकाटे यांच्या ‘चांदाचा कवडसा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. यावेळी काही निवडक साहित्यिकांना ‘बंधुता काव्यप्रतिभा’ आणि ‘बंधुता मायमराठी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या जन्मदिवसानिमित्त दोन जून हा विश्वबंधुता दिन म्हणून साजरा केला जातो, असे मुख्य संयोजक डॉ. बंडोपंत कांबळे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!