spot_img
spot_img
spot_img

कर्मयोगिनी महिला संस्था आयोजित कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी (दिनांक : १८ मे २०२५) जागतिक कुटुंबदिनाचे औचित्य साधून कर्मयोगिनी महिला संस्था – पिंपरी चिंचवड आणि आर्य समाज मंदिर, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘घर असावे घरासारखे…’ या विशेष कविसंमेलनाला कवी आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आर्य समाज मंदिर सभागृह, पिंपरी येथे शनिवार, दिनांक १७ मे २०२५ रोजी संपन्न झालेल्या या कविसंमेलनाचे अध्यक्षपद कवयित्री सुनीती लिमये यांनी भूषविले; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, सामाजिक कार्यकर्त्या मीना पोखरणा, कर्मयोगिनी महिला संस्थेच्या अध्यक्षा सीमा गांधी, आर्य समाज मंदिर ग्रंथालय सचिव दिनेश यादव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 
गणेश आणि शारदास्तवन तसेच ग्रंथपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कर्मयोगिनी संस्थेच्या अध्यक्षा सीमा गांधी यांनी प्रास्ताविकातून , “जागृती – सृजन – प्रगती’ हे ब्रीद घेऊन कर्मयोगिनी ही संस्था कार्यरत असून जागतिक कुटुंबदिनानिमित्त व्याख्यान, विशेष कविसंमेलन आणि पुस्तक प्रकाशन असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत!’ अशी माहिती दिली. 
‘घर असावे घरासारखे…’ या कविसंमेलनात हेमंत जोशी, अमिता जोशी, वंदना इन्नाणी, केशर भुजबळ यांच्या कविता विशेष उल्लेखनीय ठरल्याबद्दल सन्मानचिन्ह, मानवस्त्र, गुलाबपुष्प आणि कवयित्री विमल लिमये रचित ‘घर’ या कवितेची रंगीत प्रतिमा प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. कविसंमेलनात गुरुदत्त वागदेकर, सुनंदा शिंगनाथ, अशोक वाघमारे, मीरा भागवत, बाळकृष्ण अमृतकर, संतोष गाढवे, शशिकला देवकर, शरद शेजवळ, जयश्री श्रीखंडे, राधाबाई वाघमारे, दिलीप अहिरे, शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, प्रभाकर वाघोले, मनीषा शिंदे, जयन्द्रथ आखाडे यांचाही सहभाग होता. अध्यक्षीय मनोगतातून सुनीती लिमये यांनी, ‘माझी आई विमल लिमये यांच्या कवितेला जगन्मान्यता मिळाली होती!’ अशी माहिती देऊन गझल सादर केली. 
कविसंमेलनापूर्वी, राज अहेरराव यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विषयावर व्याख्यान देताना, ‘तम, रज, सत्व या तीन गुणांचा समतोल साधल्यास कौटुंबिक सौख्य लाभते. प्रत्येकाने आपली आई अन् मातृभाषा यांचा सन्मान केल्यास ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही उक्ती सार्थ होईल!’ असे प्रतिपादन केले. 
कार्यक्रमादरम्यान केशर भुजबळ लिखित ‘शब्दकस्तुरी मनातली…’ या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका शमीम पठाण, प्रभारी प्राचार्य डाॅ. पांडुरंग भोसले, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, यांची प्रमुख उपस्थिती होती. केशर भुजबळ यांनी मनोगतातून, ‘आपल्या जाणिवांना शब्दांतून मांडणे म्हणजे कविता होय!’ अशी भावना व्यक्त केली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी, ‘कवितालेखन ही सहजसाध्य बाब नसून त्यासाठी वेदनेच्या तळाशी जावे लागते!’ असे विचार मांडले.
कर्मयोगिनी महिला संस्थेचे पदाधिकारी, नील गांधी, विजय भुजबळ आणि आर्य समाज मंदिर संस्थेचा कर्मचारीवर्ग यांनी संयोजनात सहकार्य केले. वंदना इन्नाणी यांनी सूत्रसंचालन केले. सलोनी गांधी यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!