spot_img
spot_img
spot_img

महानगर पालिका निवडणुक चार महिन्यात, शहरातील राजकीय पक्षांची स्थिती

संपादकीय:

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्यात याव्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोग यांना सहा मे रोजी देण्यात आले. त्यामुळे आता बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील काही महत्वाचे राजकीय पक्ष यांची शहरात किती ताकद आहे या लेख च्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत .

महानगरपालिका निवडणुका आता चार महिन्यात होतील. मागील मार्च 2022 पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक रखडली आहे या तीन,साडेतीन वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या राष्ट्रवादी पक्षाचे दोन राष्ट्रवादी झाले तसेच शिवसेनेचे दोन शिवसेना झाले. याचा परिणाम पिंपरी चिंचवड शहरातही झाला पिंपरी चिंचवड शहरातही राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शिवसेना शिंदे गट पक्ष असे राजकीय पक्षांचे स्वरूप झाले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात 2017 मध्ये माजी आमदार तथा माजी शहराध्यक्ष स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या सक्षम नेतृत्व मुळे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शंकर जगताप तसेच शहरात विधान परिषद सदस्य आमदार उमाताई खापरे व आमदार अमित गोरखे हे चार आमदार शहरात आहेत तसेच माजी नगर सेवक , पदाधिकारी यांची संख्या हि मोठी आहे त्या मुळे भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहरात मोठा पक्ष आहे.

मागील महानगरपालिका निवडणुकीत भाजपचेच सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले होते व पाच वर्षे भाजपची सत्ता राहिली आहे. मागील वर्षी झालेली लोकसभा निवडणूक असो किंवा यावर्षीची विधानसभा निवडणूक असो भारतीय जनता पक्ष हा पिंपरी चिंचवड शहरात एक नंबर वर राहिलेला पक्ष आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघात तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप तर भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगे यांनी लाखोच्या संख्येने मतदान घेऊन भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरात किती सक्षम आहे हे दाखवून दिले आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघ,पिंपरी विधानसभा मतदारसंघ व भोसरी विधानसभा मतदारसंघ या पिंपरी चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपची सदस्य संख्या इतर राजकीय पक्षाच्या तुलनेने जास्त आहे.त्यामुळे आता आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हाच मोठा पक्ष असेल व भाजपचाच महापौर होणार असल्याचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी काही दिवसापूर्वीच सांगितले आहे. तसेच आता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पद जेष्ठ नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याकडे आहे व त्यांच्याच अध्यक्षतेखाली आता महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न होतील , शत्रुघ्न काटे यांच्या वर पक्षाने दिलेली जबाबदारी ते चांगल्या प्रकारे पूर्ण करतील असे काही राजकीय जाणकार सांगतात .

तर दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकाची मोठी ताकद आहे राष्ट्रवादी पक्षाचे मागील महानगरपालिकेमध्ये निवडणुकीत 36 नगरसेवक निवडून आले होते परंतु आता राष्ट्रवादीचे दोन गट पाडल्याने अजित पवार यांची राष्ट्रवादी व शरद पवार यांची राष्ट्रवादी असे दोन पक्ष झाले आहेत यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे या पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल आहेत यांच्या मार्गदर्शनात विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या व या विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे हे पुन्हा निवडून आले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जुने अनुभवी व जाणकार असे नगरसेवक आहेत तसेच अनेक वर्षे सत्तेमध्ये असणारे नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहेत त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी हा भाजप खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरणार आहे. मागील काळात काही नगरसेवक अजित पवार यांची राष्ट्रवादी सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले ते गेलेले नगरसेवक ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत परत येणार असल्याच्या चर्चाही सध्या जोर धरत आहेत त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मोठी कामगिरी करेल यात शंका नाही असे काही जाणकारांचे मत आहे.

भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी नंतर तिसरा क्रमांक लागतो तो शिंदे गटाच्या शिवसेनेचा शिवसेनेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व शिवसेनेचे उपनेते तथा कामगार नेते इरफान सय्यद यांच्यामुळे शिवसेनेची ताकद म्हणावी तशी मोठी आहे. शहरातील हा आता तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. मागील २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर शिवसेना पक्षाचे दोन गट झाले यामध्ये शिंदे गटाची शिवसेना याची ताकद मोठी आहे मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा पराजय केला. त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेची मोट मोठ्या प्रमाणात शहरात बांधण्यात श्रीरंग बारणे यांना यश आल्या चे दिसते. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहेत मागील काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या संघटिका सुलभा उबाळे यांनीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. व कालच म्हणजे १५ मे रोजी उद्या सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मध्ये शिवसैनिकांमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्या वर भर दिला गेला त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात शिंदे यांच्या शिवसेनेचा तिसरा क्रमांक लागतो.

राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाले शरद पवार यांची राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहरात सक्रिय आहे परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला म्हणावी तशी मोठी ताकद मिळाली नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत अनेक मोठे नेते आहेत परंतु पिंपरी चिंचवड शहरातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे यामध्ये जुने जाणते व अनुभवी असे नेते नाही त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांची राष्ट्रवादी ही दुबळी मानली जाते. मागील विधानसभा निवडणुकीतही पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार यांना यश मिळविता आले नाही तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते फिके पडलेले पाहावयास मिळाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पिंपरी चिंचवड शहरात सक्षम असे नेतृत्व न मिळाल्याने शरद पवार यांची राष्ट्रवादी आगामी महानगरपालिका निवडणुकीत काही मोठी मजल मारेल असे वाटत नाही. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने शहर नेतृत्व बदलावे असे शहरातील काही नेतेमंडळी सांगत असतात सक्षम नेतृत्व नसल्यानेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दुबळी राष्ट्रवादी म्हटले जाते.

पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नंबर लागतो. मागील 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने एकूण नऊ नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर 2019 च्या निवडणुकीनंतर महा विकास आघाडीची स्थापना झाली व उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु अडीच वर्षानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत ४० आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले व त्यांनी आपली शिवसेना खरी असल्याचे सांगत भाजप बरोबर जाऊन महाराष्ट्रात आपले सरकार स्थापन केले. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला फार मोठी हानी सहन करावी लागली त्याचा परिणाम पिंपरी चिंचवड शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावरही झालेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पिंपरी चिंचवड शहरात सक्षम असे नेतृत्व पहिल्यापासूनच राहिलेले नाही सचिन भोसले यांनी शिवसेनेला मोठी ताकद देण्याचे काम केले परंतु त्यांना तेवढे यश आले नाही त्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वीच शहरात शिवसेनेचे नेतृत्व बदल करून शहराची धुरा माजी महापौर व मावळ लोकसभेसाठी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेले संजोग वाघेरे यांच्याकडे आली आहे. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या सह काही मोजके नेते सोडले तर दुसऱ्या फळीतील नेतेमंडळींना मोठा अनुभव नाही तसेच शिंदे यांच्या शिवसेनेत जसे पक्षप्रवेश होत आहेत तसे पक्षप्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पिंपरी चिंचवड शहरात नेते करत नाहीत उलट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोडून नेतेमंडळी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने आगामी महानगरपालिका निवडणूकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनापक्षाला मोठी कामगिरी करता येईल असे सध्या तरी वाटत नाही.

आता राहिला काँग्रेस पक्ष, देशात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे परंतु पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाचा नंबर हा खूप खाली आलेला आहे एकेकाळी काँग्रेस पक्षाची निर्विवाद सत्ता पिंपरी चिंचवड शहरात असताना पिंपरी चिंचवड शहराला वैभव मिळवून देणारा पक्ष म्हणून काँग्रेसचे नाव घेतले जाते परंतु सध्या शहरात काँग्रेसची स्थिती वाईट आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात मोठा असतानाही काँग्रेस पक्षाला पिंपरी चिंचवड शहरात मोठे नेते राहिलेले नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी प्रथम शहराध्यक्षपद स्वीकारताना पक्षाला नवीन ताकद देण्याचे काम केले परंतु त्यांना ते जास्त दिवस करता आले नाही व सध्या काँग्रेस पक्षाला चांगले दिवस नाहीत. मागील 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसचे अस्तित्व असूनही काँग्रेसकडे सक्षम असे नेतेमंडळी नसल्याने या आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला कितपत यश मिळविता येईल यातही शंका आहे.

पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी यांच्या सह अनेक लहान लहान राजकीय पक्ष आहेत परंतु महानगरपालिका निवडणुकीत यश मिळविण्या इतपत या लहान लहान राजकीय पक्षांची ताकद नाही.
आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून परत एकदा सत्ता स्थापन करेल असे एकंदरीत दिसत आहे तसेच दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल व तिसऱ्या क्रमांकावर शिंदे यांची शिवसेना किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल असे दिसते परंतु महानगरपालिका निवडणुकीला अजून चार महिने बाकी आहे या चार महिन्यात किती राजकीय समीकरणे बदलतील यावरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कोणता पक्ष सत्ता स्थापन करेल व कोणता पक्ष विरोधी पक्ष म्हणून राहील हे आत्ताच सांगणे कठीण आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!