स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या!’ – डाॅ. दत्ता कोहिनकर
श्री स्वामी समर्थ व्याख्यानमाला – प्रथम पुष्प
पिंपरी (दिनांक : १६ मे २०२५) ‘स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या!’ असा सल्ला ज्येष्ठ समुपदेशक डाॅ. दत्ता कोहिनकर यांनी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, शिवतेजनगर, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी दिला. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेत ‘मनाची अमर्याद शक्ती व समाजस्वास्थ’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना डाॅ. दत्ता कोहिनकर बोलत होते. शिवलिंग ढवळेश्वर अध्यक्षस्थानी होते.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. माजी उपमहापौर तुषार हिंगे, पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, समन्वयक राजेंद्र घावटे, उद्योजक भगवान पठारे, प्रा. दिगंबर ढोकले, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
नारायण बहिरवाडे यांनी प्रास्ताविकातून, ‘तेरा वर्षांपासून श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आता यावर्षी व्याख्यानमालेचाही त्यात समावेश झालेला आहे!’ अशी माहिती दिली. राजाभाऊ गोलांडे यांनी, ‘श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान म्हणजे भक्ती – शक्तीचा संगम आहे!’ असे गौरवोद्गार काढले. श्रीरंग बारणे यांनी उद्घाटनपर मनोगतातून, ‘मी असुरक्षित आहे अशी माणसाची भावना असते; पण ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!’ असे स्वामी समर्थ यांनी म्हटले आहे. व्याख्यानमालांच्या माध्यमातून पिंपरी – चिंचवड शहरात सुमारे चाळीस वर्षांपासून प्रबोधनाची चळवळ सुरू आहे; पण तरुणवर्ग व्याख्यानांकडे वळला पाहिजे!’ असे आवाहन केले. शिवलिंग ढवळेश्वर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘मोबाइलच्या आभासी जगातून बाहेर पडून सर्वांनी प्रबोधनाच्या कार्यात सहभागी व्हावे!’ अशी अपेक्षा व्यक्त केली.
डाॅ. दत्ता कोहिनकर पुढे म्हणाले की, ‘एका प्रख्यात नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात लोकसंख्येच्या एक टक्के व्यक्ती ठार वेड्या आहेत, जगातल्या दहा टक्के लोकांना रात्री शांतपणे झोप लागत नाही, सन २०७७ पर्यंत जगातील चाळीस टक्के व्यक्ती ठार वेड्या होतील आणि एका वर्षाच्या कालावधीत पुण्यात सुमारे ५९५ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत, असे धक्कादायक निष्कर्ष नोंदवले होते. या सर्व गोष्टी मनावरील नियंत्रणाशी निगडित आहेत. या पार्श्वभूमीवर मन म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. ‘जे चिंतन करते ते मन!’ अशी मनाची व्याख्या केली जाते. आपल्या शरीरातील पन्नास ट्रिलियन पेशींमध्ये मन अस्तित्वात असते. सर्व धर्मग्रंथांचा सारांश मानवी जीवन सुखी झाले पाहिजे असा आहे. अर्थातच मन सुखी असेल तर जीवन सुखी होईल. यासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी नियमितपणे मनाचे व्यायाम करणे गरजेचे आहे. बाह्यमनाने अंतर्मनाला दिलेले संदेश परिणामकारक ठरतात. करोना काळात नकारात्मक बातम्यांनी अनेकांनी प्राण गमावले, हे आपण अनुभवले आहे. याउलट बाह्यमनाने सकारात्मक संदेश दिला; तर शरीरांतर्गत अनेक सकारात्मक संप्रेरके स्त्रवतात. मोजून सातत्याने शंभर टाळ्या वाजवल्यावर हृदयविकाराचा ऐंशी टक्के धोका कमी होतो. त्यामुळेच तृतीयपंथी व्यक्तींना कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. आपल्या धार्मिक परंपरेत टाळ्या वाजवून आरती म्हणण्याच्या प्रथेला म्हणूनच खूप महत्त्व आहे. मन विश्वासावर काम करते, हा विज्ञानाधिष्ठित नियम आहे. त्यामुळे झोपण्यापूर्वी दहा मिनिटे मनाला विधायक सूचना देत राहिल्यास शरीरावर त्याचे चांगले परिणाम होतात. मी आनंदी आहे, माझे स्वास्थ्य खूप चांगले आहे, माझा आत्मविश्वास प्रबळ आहे अशा स्वयंसूचना देत राहा; कारण नव्वद टक्के आजार हे मनाशी संबंधित असतात. त्यामुळे स्वयंसूचना निश्चितच उत्तम परिणाम घडवून आणतात. तसेच जी गोष्ट तुम्हाला भयप्रद वाटते; ती वास्तवात तितकी भयावह नसते. समाजात सबलता आणायची असेल तर प्रत्येक नागरिक हा सशक्त अन् सबल झाला पाहिजे!’ भगवान बुद्ध, ज्ञानेश्वर, विवेकानंद, समर्थ रामदास, डाॅ. आंबेडकर, आईनस्टाईन, सिग्मंड फ्राईड, बिल गेट्स असे संदर्भ उद्धृत करीत तसेच योग आणि संमोहन शास्त्रातील प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून डाॅ. दत्ता कोहिनकर यांनी खुसखुशीत शैलीतून श्रोत्यांशी सुसंवाद साधला.
राजेंद्र घावटे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. आर. व्ही. राणे, दत्तात्रय बहिरवाडे, दीपक पाटील, नंदू शिरसाठ, मेघराज बागी, रोहन नंदनवाड, जगन्नाथ पाटील, हृषीकेश खटाटे यांनी संयोजनात सहकार्य केले. तेजस्विनी बडे यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र छाबडा यांनी आभार मानले.