spot_img
spot_img
spot_img

‘स्पर्धा परीक्षेसाठी नवी दिशा’ या विशेष व्याख्यानमालेस उत्साहात सुरुवात

शबनम न्यूज | पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२५: नवा अभ्यासक्रम, नवी दिशा, यशासाठी नवी रणनिती’ या विशेष व्याख्यानमालेला बुधवारी (१३ मे २०२५) उत्साहात सुरुवात झाली. या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प अ‍ॅड. सनी मानकोसकर यांनी गुंफताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी, याबाबत मोलाचा सल्ला दिला. निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन १३ मे ते २२ मे २०२५ याकाळात शहरातील विविध भागात सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात अ‍ॅड. सनी मानकोसकर यांच्या व्याख्यानाने झाली. यावेळी ते म्हणाले की, ‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करीत आहोत, त्या परीक्षेत नेमक्या कोणत्या स्वरुपाचे प्रश्न येतात, कोणत्या विषयावर आधारित जास्त प्रश्न येऊ शकतात, हे समजून घेऊन त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या दृष्टिने महत्त्वाचे असलेले मुद्दे काढण्यापूर्वी अभ्यासक्रमाचे वाचन हे पूर्ण करावे. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करण्यास प्राधान्य द्यावे,’ असेही मानकोसकर यांनी सांगतानाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगनाथ नाईकडे तर सूत्रसंचालन राजेंद्र आंभेरे यांनी केले. ग्रंथालय प्रमुख कल्पना भाऊसाहेब जाधव यांनी स्वागत केले आणि प्रविण चाबुकस्वार यांनी आभार मानले. यावेळी ग्रंथपाल वैशाली थोरात देखील उपस्थित होत्या.

व्याख्यानमालेचे वेळापत्रक व ठिकाण

१३ मे २०२५ – यमुनानगर स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका, निगडी

१५ मे २०२५ – कृष्णाजी चिंचवडे स्पर्धा परीक्षा केंद्र, चिंचवडगाव

१६ मे २०२५ – नेताजी सुभाषचंद्र बोस स्पर्धा परीक्षा केंद्र, कासारवाडी

१९ मे २०२५ – भोसरी स्पर्धा परीक्षा केंद्र, भोसरी

२० मे २०२५ – शहीद अशोक कामटे स्पर्धा परीक्षा केंद्र, सांगवी

२१ मे २०२५ – राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्पर्धा परीक्षा केंद्र, रहाटणी

२२ मे २०२५ – स्व. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा केंद्र, संभाजीनगर

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!