spot_img
spot_img
spot_img

विभागीय आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा विभागस्तरीय आढावा

शबनम न्यूज | पुणे

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तसेच विभागातील सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, जिल्हास्तरावर महसूल, पोलीस, जलसंपदा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग आदींनी समन्वयासाठी बैठक घ्यावी. औषधे आणि रास्तभाव दुकानातील अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त म्हणाले, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने जलसंपदा विभागाने सीडॅक प्रतिमान उपयोगात आणून पूरस्थितीची माहिती देण्याचे नियोजन करावे. आवश्यक उपाययोजनांसाठी हवामान विभागाशी संपर्क ठेवावा. जलसंपदा विभागाने पुणे विभागात असणाऱ्या नद्यांवरील पुलावर धोका पातळी चिन्हांकित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे. आवश्यक तेथे जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने आंतरराज्य बैठका तातडीने घ्याव्यात. जलसंपदा विभागाने पूर परिस्थितीचा नेहमी सामना करणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मागील वर्षीच्या कामगिरीसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफला धन्यवाद देऊन डॉ. पुलकुंडवार म्हणाले, एनडीआरएफने पुण्यासाठी २ पथके कायमस्वरूपी ठेवावीत आणि एक पथक राखीव असावे. तर कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यात प्रत्येकी एक पथक असावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर परिस्थितीत वाहतूक वळविण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी विभागातील नियोजनाविषयी माहिती दिली. पूरस्थितीची पूर्व कल्पना देण्यासाठी जलसंपदा विभागाने सीडॅक आणि हवामान विभागाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.

बैठकीला आरोग्य, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, एनडीआरएफ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!