शबनम न्यूज | पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९४.१० टक्के लागला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही घट झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी घटला आहे.कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वांत कमी नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ या वेळी उपस्थित होते.
राज्यभरातील २३ हजार ४८९ शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत ९२.३१ टक्के मुले, तर ९६.१४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८३ने जास्त आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९९.३२ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्याला निकाल सर्वांत कमी ८२.६७ टक्के लागला.
राज्यभरातील ३७ परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणे निदर्शनास आली. मात्र कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या चार विभागातील एकाही परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरण निदर्शनास आले नाही. तर पुणे, नागपूर, लातूर विभागात प्रत्येकी सात, छत्रपती संभाजीनगर विभागात तेरा, मुंबई विभागात तीन प्रकरणे नोंदवली गेली असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.