भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला प्रतिसाद
– ‘पीएमआरडीए’ प्रशासनाचा सर्वसाधारण सभेत प्रस्ताव
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे पेठ क्रमांक 5 व 8 मध्ये उभारण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंन्शन केंद्राला (PIECC) ला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव PMRDA च्या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.
बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच 140 फूटाचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
पिंपरी-चिंचवडकरांसह शिव-शुंभू प्रेमींसाठी ही अभिमानाची बाब आहे. त्या अनुशंगाने याच परिसरात उभारलेले पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंन्शन केंद्राला धर्मवीर संभाजी राजे यांचे नाव द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि PMRDA चे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांना केली होती.
दरम्यान, महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पेठ क्र. 5 व 8 मोशी येथील औद्योगिक प्रदर्शन केंद्र या आरक्षणाचे नामाभिधान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंन्शन सेंटर, मोशी, पुणे. असे करण्यात आले आहे. या नावानुसार सदर प्रकल्पाचे प्राधिकरण कार्यालय व शासन अभिखेखी नोंदी असून, त्या प्रमाणे कामकाज करण्यात येते. त्यामुळे प्रकल्पाचे नावविस्ताराची केलेली मागणीबाबत धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहेत. त्या अनुशंगाने सदर प्रस्ताव तयार करुन प्राधिकरणाच्या सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, असे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी कळवले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची सर्वसाधारण सभा होते. त्या सभेत मान्यता मिळाल्यानंतर ‘‘हिंदूभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र’’ असा नामविस्तार होईल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
अखंड हिंदूस्थानचे श्रद्धास्थान व स्फूर्तीस्थान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शन केंद्राला द्यावे, अशी शिव-शुंभप्रेमींची भावना आहे. त्या अनुशंगाने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रस्तावाला मान्यता मिळेल, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.