spot_img
spot_img
spot_img

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे संतोष जुवेकर

एमआयटी एडीटी’चा ‘कारी-२०२५’ महोत्सव संपन्न

पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त आयुष्य घेऊन जन्मते. इतिहासात कायमच योगदानाची नोंद राहते व्यवहाराची नाही. त्यामुळे कलाकाराने केवळ व्यवहारावर भर न देता योगदानावर भर द्यावा व सेलिब्रिटी होण्याचा हट्ट सोडून शेवटपर्यंत स्वतःतील कलाकार जिवंत ठेवून अखेरीस शांती व तृप्ती रसाचा आनंद घ्यावा, असे मत प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते संतोष जुवेकर यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव
कारी-२०२५” च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कुलसचिव प्रा.डाॅ.महेश चोपडे, अधिष्ठाता डाॅ.मिलिंद ढोबळे, कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयक डाॅ.मुक्ता अवचट, समन्वयक डाॅ.विराज कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी जुवेकर पुढे म्हणाले, आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण मी अप्लाईड आणि फाईन आर्टिस्ट आहे, असे सांगतो. परंतू माझ्या मते आपले कलाकार असणे आणि त्यापेक्षाही आपल्यातील कला’कारी’ अधिक महत्त्वाची असते. कला ही मनुष्याच्या अंतापर्यंत साथ देते, आणि ज्याला कलेची आवड आहे, त्यालाच मनुष्य म्हटले जाऊ शकते.
ज्येष्ठ कलावंत श्री. सुहास बहुलकर यावेळी म्हणाले, ‘कारि’ म्हणजे, काहीतरी नाविण्यपूर्ण घडविणे. ज्यामध्ये कविता, कलाकृती, चित्र, फोटो, तंत्रज्ञान, चित्रपट अशा प्रत्येक चागोष्टीचा अंतर्भाव होऊ शकतो. एमआयटी एडीटी विद्यापीठाचा कॅम्पस मुळात अनेक कलाकृतींचा संगम असून जेथून अनेक कलाकार घडत आहेत. कित्येक दिवसांपासून माझी ललित कला, परफाॅर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिजाइन आणि आर्किटेक्चर या सर्व गोष्टी एकाच छताखाली पाहण्याची इच्छा होती, ती आज ‘कारी’च्या माध्यमातून पूर्ण होत आहे. खरंतर कला ही कुठल्याही व्यक्तिच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा असा भाग असते. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देत, कलाभिमूख शिक्षणाकडे ‘एमआयटी एडीटी’चा असणारा भर नक्कीच उल्लेखनीय आहे, असेही त्यांनी म्हटले.

सुहास बहुलकर यांना विश्वारंभ कला पुरस्कार


‘कारी-२०२५’ उत्सवानिमित्त कलाक्षेत्रातील बहुमुल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ कलावंत श्री. सुहास बहुलकर यांचा डाॅ.विनोद शहा (प्रसिद्ध चिकित्सक तथा समाजसेवक) व डाॅ.स्वाती कराड-चाटे (विश्वस्त माईर्स एमआयटी शिक्षण समुह) यांच्या हस्ते ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच यानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते प्रा.डाॅ.मिलिंद ढोबळे लिखित ‘प्राचीन लेणी – एक दृश्य अन्वेषण’, प्रा.डाॅ.सुभाष बाभुळकर लिखित डाॅ.आनंद कुमारस्वामी या पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात आले.

‘बंद आखोंसे देखे गये सपनों को, जो साकार करें वो कलाकार होता है!’, अगदी तशाच प्रकारे ‘विश्वारंभ’, या नावातच काहीतरी नाविन्यपूर्ण तयार करण्याची संकल्पना जडलेली आहे. अर्थातच या पुरस्कारामागे आमचे मार्गदर्शक प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड यांची प्रेरणा आहे. प्रा.डाॅ.कराड हेही एक सुंदर कलाकार आहेत. जगातील सर्वांत मोठा विश्वशांती घुमट आणि विश्वराजबाग या त्यांच्याच दृष्टीतून साकारल्या गेलेल्या अप्रतिम कलाकृती आहेत. त्यामुळे आज ‘कारि’ प्रसंगी ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ प्रदान करताना अतिशय आनंद होत आहे.
– डाॅ.स्वाती कराड-चाटे,
विश्वस्त, माईर्स एमआयटी शिक्षण समुह, भारत

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!