पुणे : केएसबी लिमिटेडने 2025 च्या पहिल्या तिमाहीत भक्कम आर्थिक कामगिरी करत स्थैर्य आणि सातत्यपूर्ण वृद्धी दाखवली आहे. कंपनीची एकूण विक्री 595 कोटी रुपये झाली असून, 2024 च्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात 9.4 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. ऑपरेटिंग नफा मार्जिन 11.4 टक्क्यांवर स्थिर राहिला आहे, ज्यामुळे कंपनीच्या प्रभावी व्यवस्थापन क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या तिमाहीत कंपनीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण असे यश संपादन केले आहे. ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’अंतर्गत (घटक बी) त्यांना काम मंजुरी पत्र प्राप्त झाले आहे. त्रिपुरा अक्षय ऊर्जा विकास संस्थेने केएसबीला सुमारे 14 कोटी (1.47 मिलियन युरो) किंमतीचे 962 सौर जलपंप प्रणाली पुरवठ्याचे काम दिले आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत सुमारे 49 कोटी (5.16 मिलियन युरो) किंमतीचे 2000 सौर पंप पुरवठ्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.