spot_img
spot_img
spot_img

स्वराज्यातील किल्ले पराक्रमाची शौर्यस्थळे आहेत!’ – संदीप तापकीर

वासंतिक व्याख्यानमाला २०२५ – अंतिम पुष्प
पिंपरी (दिनांक : १२ मे २०२५) ‘स्वराज्यातील किल्ले आपल्या पराक्रमाची शौर्यस्थळे आहेत!’ असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक संदीप तापकीर यांनी विरंगुळा केंद्र, पागेच्या तालमीसमोर, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक ११ मे २०२५ रोजी केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘शिवरायांचे सुहृद गडकिल्ले’ या विषयावरील अंतिम पुष्प गंफताना संदीप तापकीर बोलत होते. गिर्यारोहक नीलेश गावडे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नागरिक संघ – चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, अंतर्गत हिशेब तपासणीस गोपाळ भसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. शंखध्वनीच्या पार्श्‍वभूमीवर दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, ‘शिवरायांच्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीचा निवडक इतिहास आपल्याला ज्ञात असतो; परंतु त्यांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष गडकिल्ले देत आहेत!’ असे विचार मांडले. नीलेश गावडे यांनी, ‘इतिहास डोळसपणे अभ्यासला पाहिजे!’ असे मत व्यक्त केले.

संदीप तापकीर पुढे म्हणाले की, ‘आपल्या राज्याचे ‘महाराष्ट्र’ हे नाव किल्ल्यांनी सार्थ ठरवले आहे. महाराष्ट्रातील किल्ले आणि इतर राज्यातील किल्ले यांत मूलभूत फरक आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या कारकिर्दीपूर्वीही किल्ले अस्तित्वात होते. इसवीसन पूर्व २२० पासून किल्ले बांधण्यात आले आहेत. समर्थ रामदासस्वामी यांनी शिवाजीमहाराजांना ‘गडपती’ असे संबोधले आहे; कारण जन्मापासून मृत्युपर्यंत त्यांची अवघी कारकीर्द किल्ल्यांभोवती व्यतीत झालेली आहे. गिरीदुर्ग आणि जलदुर्ग या प्रकारात महाराजांनी पंचवीस किल्ले बांधले. त्यांची दुर्गबांधणी वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यात त्यांनी दुर्गशास्त्राचे अनेक प्रयोग केले आहेत. अठरापगड जातीचे किल्लेदार त्यांनी नेमले. किल्ल्यांच्या माध्यमातून हजारो मावळ्यांना संघटित केले. राजगड आणि रायगड यांचे त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते. १६४५ ते १६७२ या काळात त्यांचे राजगडावर वास्तव्य होते. पुढील काळात किल्लेविषयक एका जागतिक प्रदर्शनात रायगडाच्या प्रतिकृतीला जगातील सर्वोत्कृष्ट किल्ल्याचा बहुमान प्राप्त झाला होता. शिवरायांनी ज्या ज्या किल्ल्यांवर विजय मिळविला, त्या त्या विजयासोबत काही दुःखद घटनाही त्यांच्या वाट्याला आल्या. स्वराज्याला वर्धिष्णू करताना महाराजांनी किल्ल्यांचा अत्यंत चतुराईने वापर केला. पुरंदरच्या तहात त्यांना स्वराज्यातील २३ किल्ले मिर्झाराजे जयसिंग यांना द्यावे लागले. हा त्यांच्या जीवनातील अतिशय खडतर काळ होता. पुढे तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी स्वराज्यासाठी अडीचशे किल्ले पादाक्रांत केले. १६७३ मध्ये त्यांनी रायगड हा किल्ला राजधानीसाठी निवडला. ०६ जून १६७४ रोजी येथेच त्यांनी गागाभट्ट यांच्या हस्ते राजाभिषेक करवून घेतला. हा दिवस खऱ्या अर्थाने आपला पहिला स्वातंत्र्यदिन आहे!’
स्वराज्यातील किल्ल्यांच्या दंतकथा, त्यांचा खरा इतिहास, त्यांचे वैशिष्ट्य आणि महत्त्व अशी अभ्यासपूर्ण मांडणी करीत संदीप तापकीर यांनी आताच्या काळात दुर्ग संवर्धनाची गरज आहे, असे आवाहन केले.

रत्नप्रभा खोत, मंगला दळवी, उषा गर्भे, अलका इनामदार, नीलिमा कांबळे, मंदाकिनी दीक्षित, अरविंद जोशी, नारायण दिवेकर, राजेंद्र भागवत, सतीश लिपारे, सुधाकर कुलकर्णी, हरिभाऊ क्षीरसागर, सुनील चव्हाण, शहाजी कांबळे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. श्यामकांत खटावकर यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने व्याख्यानमालेचा समारोप करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!