spot_img
spot_img
spot_img

‘माणूस ही ईश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती!’ – प्रा. दिगंबर ढोकले

शबनम न्यूज | पिंपरी

‘माणूस ही ईश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे म्हणूनच मानवी जीवन सुंदर आहे. ते आपण अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करू!’ असे आवाहन प्रा. दिगंबर ढोकले यांनी विरंगुळा केंद्र, पागेच्या तालमीसमोर, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक १० मे २०२५ रोजी केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना प्रा. दिगंबर ढोकले बोलत होते. युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल भोईर, ज्येष्ठ नागरिक संघ – चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, सहकार्यवाह भिवाजी गावडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, ‘आपले जीवन सुंदर असावे असे प्रत्येकालाच वाटते. माणूस हा समाजशील प्राणी असल्याने सहजीवनात तो रमतो. परस्पर सौहार्दातून प्रेम वाढते अन् सुंदर जीवनाकडे वाटचाल सुरू होते!’ असे विचार मांडले. राहुल भोईर यांनी, ‘ज्येष्ठांनी आपल्या अनुभवातून कार्यक्रमांची आखणी करावी आणि त्यामध्ये तरुणांना सामावून घ्यावे!’ असे मत व्यक्त केले.

प्रा. दिगंबर ढोकले पुढे म्हणाले की, ‘बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या मानवी जीवनातील तीन अवस्था आहेत. बालपण गोंडस असल्याने सुंदर भासते. तारुण्य हे वीरश्रीचे प्रतीक असल्याने सुंदर असते; तर अनुभवसंपन्न वृद्धत्व हे तर सुंदरच असते. त्यामुळे बाह्यरूपावरून सौंदर्याची व्याख्या करू नये. कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात की, या आकाशरूपी सरोवरात पृथ्वीरूपी कमल उगवले आहे अन् त्या कमलदलावरील दवबिंदू म्हणजे मानवी जीवन! निसर्ग सुंदर आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत सौंदर्य दडलेले आहे; परंतु ते शोधण्याची दृष्टी हवी. माणूस भूतकाळातील गोष्टींनी दुःखी होतो; तर भविष्यकाळाची चिंता करतो. वास्तविक भूतकाळ या शब्दात ‘भूत’ आहे; तर भविष्यकाळ या शब्दात ‘विष’ आहे; परंतु वर्तमान या शब्दात ‘मान’ आहे. त्यामुळे नेहमी वर्तमानकाळात जगले पाहिजे. भारतीय संस्कृतीतील एकत्र कुटुंबपद्धत ही जगात वंदनीय आहे. नातवंडांच्या सान्निध्यात सायंकाळ व्यतीत करण्यासारखे सौख्य नाही. ज्ञानेश्वरमाउलींनी सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठांनी साच अन् मवाळ तसेच मितुले अन् रसाळ बोलावे; तरच त्यांना घरात मान मिळतो. वास्तविक प्रत्येक माणूस हा अद्वितीय असतो म्हणून दुसर्‍याशी तुलना करण्याचे टाळावे; अन्यथा ते दुःखाचे कारण ठरते. संगीत, हास्यविनोद ही जीवन सुंदर करण्याची साधने आहेत. ज्येष्ठांनी आशीर्वादासह आपल्या जवळील ज्ञानाचे संचित देत राहावे; परंतु ‘नटसम्राट’मधील म्हातार्‍याप्रमाणे कफल्लक होऊ नये!’ प्रभू रामचंद्र, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, डॉ. राधाकृष्णन, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर, शिव खेरा असे विविध संदर्भ उद्धृत करीत लालित्यपूर्ण शैलीतून प्रा. दिगंबर ढोकले यांनी विषयाची मांडणी केली. मंगेश पाडगावकर आणि गुरू ठाकूर यांच्या कवितांचे अभिवाचन करीत त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला.

रत्नप्रभा खोत, मंगला दळवी, उषा गर्भे, अलका इनामदार, नीलिमा कांबळे, मंदाकिनी दीक्षित, अरविंद जोशी, नारायण दिवेकर, राजेंद्र भागवत, सतीश लिपारे, सुधाकर कुलकर्णी, हरिभाऊ क्षीरसागर, सुनील चव्हाण, शहाजी कांबळे, श्यामकांत खटावकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. गोपाळ भसे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार मुरडे यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!