spot_img
spot_img
spot_img

‘देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील

शबनम न्यूज | पिंपरी

‘स्वराज्यासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजीमहाराज यांनी जगाला दाखवले; तर देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे – पाटील यांनी शुक्रवार, दिनांक ०९ मे २०२५ रोजी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘छत्रपती संभाजीमहाराज : धगधगती अंगारगाथा’ या विषयावरील तिसरे पुष्प गुंफताना प्रा. नितीन बानगुडे – पाटील बोलत होते. बांधकाम व्यावसायिक सागर धुमाळ अध्यक्षस्थानी होते; तसेच उद्योजक भगवान पठारे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, नरेंद्र बनसोडे, आदित्य हजारे, राजू दुर्गे, आयुष निंबारकर, भावेश भोजने, मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. नितीन बानगुडे – पाटील पुढे म्हणाले की, ‘प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसे करावे याचा वस्तुपाठ शंभुराजे यांनी घालून दिला. १४ मे १६५७ रोजी जन्मलेल्या या बाळाचे ‘संभाजीराजे’ असे नामकरण जिजाऊ माँसाहेब यांनी केले होते. दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र यांमध्ये निपुण होत त्यांनी इंग्रजीसह सोळा भाषांवर प्रभुत्व मिळवले. काव्यरचना आणि संस्कृत भाषेतील ‘बुधभूषण’ आदी ग्रंथांचे लेखन करताना मल्लखांब, घोडेस्वारी यांमध्ये प्रावीण्य मिळवले. आग्रा येथून सुटका करून घेताना शत्रूची दिशाभूल करण्यासाठी शिवाजीमहाराज यांनी शुंभराजे यांचे निधन झाल्याची खोटी वार्ता प्रसूत केली; पण त्यानंतर मृत्यू सतत त्यांचा पाठलाग करीत राहिला. शिवाजीमहाराज यांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी शंभुराजे यांनी चोखपणे पार पाडली. शिवाजीमहाराज यांचे निधन झाल्यानंतर शंभुराजे यांच्या विरोधात कारस्थान रचण्यात आले; परंतु हंबीरराव यांनी ते हाणून पाडले. त्यांच्यावर तीन वेळा विषप्रयोग करण्यात आला. छत्रपती झाल्यानंतर शंभुराजे यांनी बुऱ्हाणपूर लुटल्यावर औरंगजेब चवताळून उठला. आपल्या अफाट सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. शंभुराजे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावर बादशाही पगडी घालणार नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली; पण शेवटपर्यंत पगडी घालण्याची संधी त्याला मिळाली नाही. दुर्दैवाने परिस्थितीने शंभुराजे यांना साथ दिली नाही; आणि त्यांना कैद झाली. अनन्वित अत्याचार आणि अवहेलना सोसून त्यांनी बलिदान दिले; परंतु एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा अशी इतिहासाला त्यांची दखल घ्यावी लागली; तसेच नाट्य – चित्रपटसृष्टीतून त्यांचा बदनामीकारक इतिहास रंगवला गेला; पण शिवाजीमहाराज यांच्या चारित्र्याइतकेच शंभुराजे यांचे चारित्र्य स्वच्छ होते!’ अतिशय ओघवत्या अन् अभिनिवेशपूर्ण वक्तृत्वशैलीतून बानगुडे – पाटील यांनी संभाजीमहाराज यांचा ज्वलंत जीवनपट मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

प्रकाश हगवणे, राम नलावडे, शरद थोरात, विक्रम पवार, जितेंद्र छाबडा यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. मारुती भापकर यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!