शबनम न्यूज | पिंपरी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार याद्या याची तयारी करावी लागणार आहे. मात्र, अद्याप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाला लेखी आदेश नसल्याने ते आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निवडणुकीचे कामकाज करण्याबाबत महापालिकेच्या निवडणूक विभागाला आदेशाची प्रतिक्षा आहे. यावेळी २०२२ पूर्वी केलेल्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, त्यासाठी नोटिफिकेशन काढून सूचना व हरकती घ्याव्या लागतील. आरक्षण सोडत देखील काढावी लागणार आहे.
शहरात १६ लाख ६३ हजार मतदार असून मतदार याद्या कराव्या लागणार आहेत. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या निवडणूक विभागाला आदेश येणे आवश्यक आहे. त्याच्या प्रतीक्षेत विभाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.