शबनम न्यूज | पिंपरी
“ध्येयापर्यंत पोहोचण्याची प्रबळ महत्वाकांक्षा असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर कोणतेही कार्य अशक्य नसते.” असे प्रतिपादन क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे प्रमुख सल्लागार सतीश काळोखे यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त कर्मचारी दामोदर चव्हाण यांच्या संकल्पनेतून भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे थरमॅक्स कंपनीतील टी.ओ.सी. आणि चिल्लर विभागातील निवृत्त कामगार-कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेश पूजा आणि “गर्जा महाराष्ट्र माझा” या प्रेरणादायी गीताने करण्यात आली.त्यानंतर मागील काळात दिवंगत झालेल्या कामगार कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सतीश काळोखे पुढे म्हणाले की, “जपानमधील औद्योगिक क्षेत्रात रुजलेल्या आणि यशस्वीपणे वाटचाल करत असलेल्या क्वालिटी सर्कलची संकल्पना आपल्या देशात आणि विशेषता थरमॅक्स कंपनीत रुजविणे फारच अवघड काम होते. परंतु कामगार-कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही संकल्पना केवळ कार्यान्वितच झाली नाही, तर आम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारता आली.त्यामुळे आमच्यातील आत्मविश्वास वाढला, कामातील गुणवत्ता वाढली आणि संघटन कौशल्य हे गुण आत्मसात करता आले.”
ज्येष्ठ व्यवस्थापक बी सेल्वम यांनी थरमॅक्समधील अनुभव कथन करताना सांगितले की, “येथे येण्यापूर्वी मी अनेक ठिकाणी नोकरी केली, पण थरमॅक्समधील माझ्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता. कारण येथील प्रत्येक कर्मचारी सक्रिय दिसत असल्यामुळे संपूर्ण वातावरण तरुण, उत्साही आणि प्रेरणादायक होते.”
या स्नेहमेळाव्यासाठी माजी व्यवस्थापक एस.एस. बहिरगोंडे, बी.सेलम,अब्राहम मॅथ्यू,रवींद्र पाटील,आर.पी.पारगावकर, सतीश चिंचाळकर,जे.कोहेन, सत्यवान सावंत,एस.एस.कुलकर्णी,व्ही.एम. देवस्थळी, माधव गुरव,विनोद पाटील,संजय शितोळे हे आजी-माजी अधिकारी तसेच कवी,लेखक तानाजी एकोंडे,थरमॅक्स कामगार संघटनेचे अध्यक्ष महिंद्र पासलकर,माजी अध्यक्ष दादासाहेब काळे, सचिव अनिल हडवळे,ह.भ.प.रमेश महाराज ढमाळे आणि कंपनीतील अनेक निवृत्त आणि विद्यमान कामगार-कर्मचारी उपस्थित होते.
“तसं पाहिलं तर थरमॅक्ससारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असलेल्या कंपनीतील निवृत्त कर्मचारी संपूर्ण देशात पसरलेले आहेत. निवृत्तीनंतर कोणी कायमस्वरूपी आपल्या गावी गेले आहेत, तर कोणी पूर्वीचे घर सोडून इतरत्र राहायला गेले.अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा एकत्र करणे हे म्हणावे तितके सोपे काम नव्हते, परंतु दीर्घकाळ एकमेकांच्या सहवासात राहिलेल्या मित्रांच्या प्रेमापोटी आणि इतर सहकाऱ्यांच्या तथा इंटरनेटच्या माध्यमातून हे काम सहज करता आले.” असे कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक दामोदर चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
चव्हाण पुढे म्हणाले की, “आम्ही सर्व सत्तरीच्या घरातील कामगार-कर्मचारी असलो, तरी तरुणाइतकीच आमची उत्साही आणि स्फूर्तीदायक मैत्री आहे. मागील पन्नासेक वर्षापासून जपलेल्या या मैत्रीला निवृत्तीनंतर पुन्हा एकदा ताजेतवाने करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतरचा आनंद काय असतो, तो आम्ही या मेळाव्यातून अनुभवला.”
दादासाहेब काळे,महेंद्र पासलकर,एस.एस.बहिरगोंडे, रामप्रसाद,रमेश ढमाले महाराज यांनी कंपनीतील अनुभव कथन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.अंतिम क्षणी निवृत्त कर्मचारी नरेंद्र जोशी यांच्या प्रसाद या मुलाने ठराविक अंतराने एव्हरेस्ट शिखरसह ,धवलागिरी आणि कांचनजूंगा असे जगातील अत्युच्च शिखर सर केले.त्याबाबतची चित्रफित दाखविण्यात आली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
निवेदक तानाजी एकोंडे यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.माधव राखुंडे,सुरेश गायकवाड, रघुनाथ बकाल,पांडुरंग माने, सुदर्शन माने,चंद्रशेखर रूमाले, प्रदीप खोत यांनी संयोजन कार्यात सहकार्य केले.माधव राखुंडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार आणि चहापानाचा आस्वाद घेत सर्व कामगार-कर्मचाऱ्यांनी स्नेहमेळ्याचा आनंद लुटला.