दक्षिणेपेक्षा मराठी चित्रपटांचे कथानक हे सरस असते. त्याच बरोबर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कथा हीच हिरो असते असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केले पत्रकार परिषदेत केले.
घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपट ९ मे रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘२६ नोव्हेंबर’ हा केवळ चित्रपट नसून, ही एक चळवळ आहे. अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा चित्रपट येत्या ९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माते अनिल कुमार जवादे यांनी दिली. या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, सयाजी शिंदे, विजय पाटकर, गणेश यादव, मुश्ताक खान, भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, डॉ. जुई जवादे, डॉ. विलास उजवणे आणि अंजली उजवणे यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिका साकारली आहे.
‘२६ नोव्हेंबर’ हा चित्रपट त्याच्या शक्तिशाली कथाकथनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना केवळ भावनिक करणार नाही, तर त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची नवी प्रेरणा देईल. हा सिनेमा नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी उभा राहिलेला एक प्रेरणादायी आवाज आहे. असे निर्माते अनिल कुमार जवादे आणि कार्यकारी निर्माते निलेश ओंकार यांचे एकमत आले.
चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक सचिन उराडे म्हणाले, “२६ नोव्हेंबर हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो आपल्या सर्वांना आठवण करून देतो की या देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाला जीवनाचा आनंद घेण्याचा समान अधिकार आहे. भारतीय संविधान या अत्यंत महत्वाच्या विषयावर मांडलेला ‘२६ नोव्हेंबर’ हा चित्रपट पॅनोरमा स्टुडिओज तर्फे येत्या ९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रदर्शना अगोदरच या चित्रपटाची विशेष चर्चा सुरू आहे.