शबनम न्यूज | मुंबई (वृत्तसंस्था )
जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलंय. दरम्यान, या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं”, असं म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “पहलगामला जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी जे पहिले ट्विट केले त्यामध्ये सांगितले होते की, ज्यांनी हल्ला केला त्या दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला पाहिजे जो त्यांच्या पुढील पिढ्यांनाही लक्षात राहिल. पण, दहशतवादी हल्ल्याला उत्तर उद्ध नसतं. दहशतवाद्यांनी अमेरिकेत ट्वीन टॉवर्स पाडले म्हणून त्यांनी युद्ध नाही केले. त्यांनी दहशतवादी ठार मारले.”
यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “मुळात ही गोष्ट का घडली हे लक्षात घेण्यासारखे आहे. आपण थोडासा आपला विचार करणेही गरजेचे आहे. पाकिस्तानला काय बरबाद करणार आहे, तो आधीच बरबाद झालेला देश आहे. ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केले ते अजून सापडलेले नाहीत, ज्या पर्यटन स्थळावर हल्ला झाला तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती? हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत.”