शबनम न्यूज | चिखली
कुदळवाडी भागात महापालिकेकडून टिपी स्कीम राबविण्याबाबत वर्तमानपत्रात नोटीफिकेशन प्रकाशित झाल्यानंतर त्याविरोधात स्थानिक गावकरी एकवटले आहेत.सोमवार(ता.५)रोजी गावकरी,व्यापारी आणि उद्योजक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.या स्कीमला कडाडून विरोध करण्यात येणार असून,वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.यावेळी नोटिफिकेशनची होळी करण्यात येऊन,पालिकेचा निषेध करण्यात आला.
गावकऱ्यांना जशी नोटोफिकेशनची खबर लागली,तसेच त्यांनी एकमेकांना सूचित करून तत्काळ बैठकीचे आयोजन केले.जर टीपी स्कीम लादली गेली तर पालिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा बैठकीत वक्त्यांनी दिला.तसेच कुणालाही विश्वासात न घेता,असे नोटीफिकेशन प्रसिद्ध करणे म्हणजे हुकूमशाही मानसिकतेचे द्योतक असल्याचे मत वक्त्यांनी यावेळी मांडले.पालिकेचा कारभार हा लोकशाही मार्गाने होणे अपेक्षित असताना,नागरिकांच्या पायाभूत गरजांना पायदळी तुडविण्यात येत असून,जमीन आमची माय असून,तिच्यावर डोळा टाकणाऱ्यांना अद्दल घडवू असे मत काहींनी मांडले.प्राधिकरण अस्तित्वात आणल्यापासून गेल्या पन्नास वर्षात पालिका आणि प्राधिकरण प्रशासनाने नुसत्या जमिनींवर डोळे लावले आणि स्थानिक गावकरी ज्यांच्या जमिनी सरकारने घेतल्या,त्यांच्या नशिबी उपेक्षा आलेली आहे.आता लादली जाणारी टिपी स्कीम ही पालिकेच्या आणि पर्यायाने राज्य शासनाच्या माणुसकीच्या धोरणाला काळिमा फासणारी आहे आणि वेळप्रसंगी पाहिजे त्या स्तराला जाऊन स्कीमला रद्द करूनच श्वास घेऊ असे यावेळी सांगण्यात आले.तसेच मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,नगरविकासमंत्री यांना गावकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन त्यांना वास्तविकतेची जाणीव करून देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.तसेच पुढील रणनीती ठरविण्यासाठी “टीपी विरोधी कृती समिती”स्थापन करण्यात येणार असून पुढील काळात दिशा ठरविण्याचे मान्य करण्यात आले.
या बैठकीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते