शबनम न्यूज | पुणे
विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने पुढील महिन्यात होणाऱ्या सातव्या विश्वबंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गजलकार सिराज शिकलगार यांची, तर स्वागताध्यक्षपदी विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षा प्रा. भारती जाधव यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
सिराज शिकलगार यांच्या ४२ साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या असून, त्यामध्ये २८ गजलसंग्रहांचा आणि ९ काव्यसंग्रहांचा समावेश आहे. प्रा. भारती जाधव या भगवान बुद्ध, भगवान महावीर, संत कबीर या महामानवांच्या मूल्यविचारांच्या अभ्यासक आहेत. संमेलनाच्या नियोजनासाठी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे आणि कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या काव्य महोत्सवात राज्यभरातील निमंत्रित कवींचा सहभाग असणार आहे, असे रोकडे यांनी नमूद केले.