- ‘मावळ ऑनलाईन’ न्यूज पोर्टलचे लोकार्पण
शबनम न्यूज | तळेगाव दाभाडे
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) ने संपूर्ण मानवी जीवन व्यापून टाकायला सुरूवात केली आहे. एआयच्या अथांग गुहेत आपण प्रवेश केला असून प्रत्येकजण चाचपडत आहे. ‘एआय’ला विविध मानवी भावभावनांची जोड देण्याचे प्रयत्न सध्या आहेत. पुढे आणखी काय-काय परिणाम होणार आहेत, याविषयी आताच कोणालाही काहीही ठामपणे सांगता येणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर सृजनशीलता तसेच विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान प्रसार माध्यमांपुढे असणार आहे, असा इशारा एबीपी न्यूज व एबीपी माझा या नामवंत वृत्तवाहिन्यांचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी दिला.
‘पुणे इन्फो मीडिया’च्या ‘मावळ ऑनलाईन डॉट कॉम’ या न्यूज पोर्टलचे लोकार्पण राजीव खांडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तळेगाव दाभाडे येथील योगीराज हॉलमध्ये झालेल्या शानदार संभारभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक ‘अंबर’चे संपादक सुरेश साखवळकर होते. मावळाबरोबरच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळ ऑनलाईनचे संस्थापक संचालक विवेक इनामदार, संपादक प्रभाकर तुमकर, संचालिका आकांक्षा इनामदार, स्नेहा इनामदार तसेच बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुगुंर्डे यांनी सर्वांचे स्वागत केले.
राजीव खांडेकर म्हणाले की, लोकसत्तामध्ये असताना व पुढे एबीपी माझामध्ये विवेक इनामदार याने माझ्याबरोबर काम केले आहे. अत्यंत प्रामाणिक, विश्वासू व तळमळीचे सहकारी व पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी काळाची पावले ओळखून खूप आधी डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात पदार्पण करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आता काळ आणखी बदलला असून त्याची आव्हाने मावळ ऑनलाईन या नव्या न्यूज पोर्टलला स्वीकारावे लागणार आहे व ते नक्की यशस्वीपणे त्याला सामोरे जातील, असा विश्वास वाटतो.
पुणे इन्फो मीडिया व मावळ ऑनलाईनच्या पुढील वाटचालीला खांडेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात सुरेश साखवळकर म्हणाले की, मी तळेगावात आलो तेव्हा विवेक इनामदार यांनी मावळ तालुक्यातील लोणावळा टाइम्स या तेव्हाच्या आघाडीच्या साप्ताहिकात पत्रकारितेची सुरूवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या ३६ वर्षांत त्यांनी नावाप्रमाणेच अत्यंत ‘विवेकी’ पत्रकारिता केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मावळ ऑनलाईन मावळवासीयांना उत्तम व विश्वासार्ह वृत्तसेवा देईल, यात तीळमात्र शंका नाही.
प्रास्ताविकात विवेक इनामदार म्हणाले की, मावळच्या मातीतच आपण पत्रकारितेच्या ‘गमभन’ शिकलो. मावळच्या मातीत वाढलो. मावळचे फार मोठे ऋण असल्याने हे नवीन न्यूज पोर्टलला मावळच्या मातीला व मावळच्या जनतेला समर्पित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. केवळ चालू घडामोडींच्या बातम्या न देता, मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वैचारिक व्यासपीठ म्हणूनही मावळ ऑनलाईन भूमिका पार पाडणार आहे.
गणेशपूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मावळ ऑनलाईन न्यूज पोर्टलचे लोकार्पण व शुभारंभ विशेषांकाचे प्रकाशन राजीव खांडेकर यांच्या हस्ते झाले. उपस्थित मान्यवरांचे गुलाबाची रोपे देऊन प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.
संपादक प्रभाकर तुमकर यांनी आभार मानले. डॉ. विनया केसकर यांनी सुरेख सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.