शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनच्या हद्दीतील चाकण, म्हाळुंगे, भोसरी एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रातून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २८ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. एक ते दोन वर्षांसाठी पाेलीस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाेलिसांच्या वतीने विविध उपाययाेजना करण्यात येत आहेत. त्यानुसार गंभीर गुन्हे दाखल असलेले मार्च महिन्यात सात, तर एप्रिलमध्ये २१ अशा २८ सराइतांना एक ते दाेन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. दराेडा, बलात्कार, जबरी चाेरी, दहशत माजविणे, खंडणी, अपहरण यासह संघटित गुन्हेगारी करणारे हे गुन्हेगार आहेत. तसेच शंभरपेक्षा जास्त गुन्हेगारांच्या हालचालींवर पाेलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.