शबनम न्यूज | मुंबई
महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने क्रिअटर आणि प्लॅटफॉर्मस उद्योगातील प्रमुखांशी मुख्यमंत्री फडणवीस गोलमेज बैठकीत बोलत होते.
महाराष्ट्रात या क्षेत्रातील निर्मात्यांना प्रेरक आणि पूरक वातावरण आहे. त्यासोबतच त्यांना चित्रीकरण करप्रणाली सवलती देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय पारंपरिक खेळांचे आधुनिक स्वरुपात रूपांतर करून त्यांचे ‘आयपी’ (बौद्धिक संपदा) तयार करणे, आणि त्या ‘आयपी’चं संपूर्ण भारतात व जागतिक स्तरावर व्यावसायीकरण करणे ही कल्पना उत्कृष्ट ठरेल.
मराठीचा कंटेंट जागतिक स्तरावर नेणार
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक मराठी कंटेंट जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मराठी कंटेंट क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी या क्षेत्रातील संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांनी सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
अपस्किलिंग, ‘आयपी’ हक्क आणि शैक्षणिक गुंतवणूक
अपस्किलिंगसाठी विविध इंडस्ट्रीने पाठबळ देणे अपेक्षित आहे. राज्य शासन टाटा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आणि कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून पूर्णपणे सहकार्य करत आहे. ‘आयपी’ (बौद्धिक संपदा) विषयावर जनजागृती करणे देखील गरजेचे आहे. माध्यम व मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष आर्थिक क्षेत्र तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. शूटिंगसाठी ‘एक खिडकी प्रणाली’ महाराष्ट्रात सुरु करण्यात आली असून यामुळे सर्व परवानग्या एका पोर्टलवरून मिळतात. शासकीय ठिकाणी शूटिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बळगन, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यासह विविध क्रिएटर कंपनीचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मराठी कंटेंट, परवाना याबाबत सूचना मांडल्या.