spot_img
spot_img
spot_img

बसवेश्वराचे शिल्प सामाजिक कार्याची प्रेरणा देत राहील! – खासदार श्रीरंग बारणे

शबनम न्यूज | पिंपरी

‘अनंत अडचणींवर मात करून उभारण्यात आलेले महात्मा बसवेश्वराचे शिल्प सामाजिक कार्याची प्रेरणा देत राहील!’ असे विचार खासदार श्रीरंग बारणे यांनी महात्मा बसवेश्वर पुतळा उद्यान, भक्ती – शक्ती चौक, निगडी येथे बुधवार, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी व्यक्त केले. वीरशैव लिंगायत समाज आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव २०२५ मध्ये लिंगायत समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. माजी नगरसेविका सुमन पवळे, बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष नारायण बहिरवाडे, महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी एस. बी. पाटील (बांधकाम व्यावसायिक), मनोहर दिवाण (सामाजिक), डॉ. अशोक नगरकर (शास्त्रज्ञ), डॉ. स्वाती महाळंक(पत्रकारिता), अवधूत भागानगरे (क्रीडा) यांना महात्मा बसवेश्वर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून
गौरविण्यात आले; तसेच चंद्रशेखर दलाल, बसवराज कुल्लोळी, सुरेश वाळके, डॉ. विनीता लिंगायत, रमाकांत अडके यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. स्वाती महाळंक यांनी पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. राजाराम सावंत यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. नारायण बहिरवाडे यांनी प्रास्ताविकातून, ‘लिंगायत समाजातील मी एकमेव लोकप्रतिनिधी असल्याने महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी जागा मिळविण्यापासून शिल्प उभारणीपर्यंत सातत्याने प्रयत्न करावे लागले. यासाठी श्रीरंग बारणे यांनी वेळोवेळी मदत केली. लोकवर्गणीतून १९ जून २०२३ रोजी शिल्प उभे राहिले; आणि लिंगायत समाजाचे स्वप्न साकार झाले!’ अशी माहिती दिली.

जयंती उत्सवात सकाळी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि बसवेश्वर पुतळा पूजन हे उपक्रम राबविण्यात आले.

पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर भारुडसम्राट ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू आणि सहकारी यांनी ‘मानवी जीवनाचे सत्य’ हा बहुरंगी भारुडाचा कार्यक्रम सादर केला. कडकलक्ष्मी, वारीक, बोहारीण, वेडी भिकारीण अशी वेगवेगळी सोंगे घेत लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी उपस्थित श्रोत्यांचे प्रबोधन केले. यावेळी किसन साळुंखे, देवा भिसे, रवी साबळे, भागवत शिंदे आणि श्रीपाद राजगुरू यांनी संत तुकाराम, संत एकनाथ, संत सेनामहाराज, कबीर यांच्या भक्तिरचना सादर करीत सांगीतिक साथसंगत केली.

दत्तात्रय बहिरवाडे, अण्णाराय बिरादार, गुरुराज चरंतीमठ, बसवराज साखरे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी साखरे यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!