spot_img
spot_img
spot_img

महात्मा बसवेश्वर महाराज तसेच संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

शबनम न्यूज | पिंपरी

महात्मा बसवेश्वर महाराज यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्व स्तरातील लोकांना समान अधिकार दिले,समाजातील लोकांनी स्वत:च्या हक्काबाबत जागरूक व्हावे यासाठी शिक्षण व सामाजिक जाणीव देण्याचा प्रयत्न केला तसेच समाजातील उपेक्षितांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम सुरु केले,त्यांच्या विचारांमधून आपल्याला आधुनिक लोकशाहीचे दर्शन घडते, तर थोर संत तुकडोजी महाराज यांनी समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल यासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

      महात्मा बसवेश्वर महाराज तसेच संत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम आणि उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी तर निगडी येथील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे हे बोलत होते.

       यावेळी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत शेटे, अण्णा बिरादार, दत्ता बहिरवाडे, राजेद्र घावटे,बसवराज कुल्लाले, चंद्रशेखर दलाल, शिवाजी साखरे, हेमंत हरहरे, विजयकुमार स्वामी, दानिश निमशेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

       पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने तसेच महात्मा बसवेश्वर पुतळा समितीच्या सहकार्यातून जगतज्योती महात्मा बसवेश्वर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्याख्यान,भजन, वकृत्व स्पर्धा, पिंपरी साहित्य मंच आयोजित कवी संमेलन, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण कार्यक्रम,भव्य बसवेश्वर रॅली असे कार्यक्रम झाले. तर प्रा. संजय कळमकर यांचे ‘जगण्याच्या आनंदी वाटा’ या विषयावर व  डॉ. श्रीपाल सबनीस यांचे ‘महात्मा बसवेश्वर व भारतीय लोकशाही’ या विषयावर व्याख्यान झाले. तसेच ‘मानवी जीवनाचे सत्य’ या विषयावर ह.भ.प. श्री लक्ष्मण महाराज राजगुरू यांचा भारुडाचा कार्यक्रम सादर झाला. या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

‘महात्मा बसवेश्वर व भारतीय लोकशाही’

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त ‘महात्मा बसवेश्वर व भारतीय लोकशाही’ या विषयावर जेष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना डाॅ.श्रीपाल सबनीस म्हणाले की महात्मा बसवेश्वर यांनी समाजात सामाजिक समानता, न्याय, लोकशाही आणि लोकसहभाग यांसारख्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी वर्णव्यवस्थेला विरोध करून सर्वसामान्य जनतेला समान अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यामुळे लोकशाही व्यवस्थेची मुळे अधिक मजबूत झाली आहेत असे सांगून महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा आदर्श आज सर्वांनी घेण्याची गरज असल्याचे मतही यावेळी त्यांनी मांडले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!