शबनम न्यूज | देश-विदेश
दि. २६/०४/२५ रोजी नेदरलॅंड्समधील लाईश्नडॅम येथे डॅा. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, युरोप तर्फे महात्मा ज्योतीबा फुले आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
हंगेरीमधल्या रोमा आणि जिप्सी समुदायांसाठी शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या डॅा. आंबेडकर स्कुलचे प्रमुख डॅा. तिबोअर देअरदिक आणि जयभीम नेटवर्कचे अध्यक्ष यानोस ओर्सोस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख लाखो-करोडो भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरला आहे आणि हीच प्रेरणा भारतातील तरुणांकडून घेऊन पूर्व युरोपातील ह्या रोमा आणि जिप्सी समुहातील मुले शिक्षणाच्या वाटेवर पुढे जात आहेत हे मौलिक विचार त्यांनी मांडले.
याचबरोबरीने नेदरलॅंड्समधील बिझनेस कोच डॅा. मार्को कोल यांनी भारतातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार मिळणे आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे किती आवश्यक आहे ते स्पष्ट केले. येत्या काही वर्षांत भारतातील विशेषतः मागासवर्गीय महिलांसाठी व्हेंचर फंड कसा निर्माण करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
बुद्धिस्ट आयकॅानोग्राफी आणि तत्वज्ञानावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी प्रा. वाय. एस. अलोने हे भारतातून टेलीलिंकद्वारे सामील झाले. अवकाशविज्ञान आणि उपग्रह क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणाऱ्या सम्यक डेकाटे यांनी लहान मुले आणि तरुणांना ह्या क्षेत्रातील अनेक संधीची ओळख करून दिली.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाविषयी कार्यक्रमात विस्ताराने माहिती देण्यात आली. तसेच संत रविदास आणि संत कबीरांचा वारसा लाभलेल्या रविदासी समुहातील पाहुण्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. सांस्कृतिक कार्यक्रम आणि जल्लोषाने पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाची सुत्र शिल्पा गणवीर यांनी सांभाळली. तसेच कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी पंकज थूल, सुमीत मेश्राम, अपर्णा थूल, प्रकाश अय्यर, अमोल नाईक, दीपक धनविजय, सुनील वर्थी, विकास बागडे, प्रदीप बनसोड, प्रतीक वहाणे, कौस्तुभ सावतकर, रितेश कडबे, रवी झिल्टे, शुभम मेश्राम यांनी सहकार्य केले. नेदरलॅंड्स, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन आणि कॅनडामधून आलेल्या भारतीय आंबेडकरी लोकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.