पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
तळेगाव एमआयडीसी परिसरात अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून महिला आरोपी घटनास्थळावरून पसार झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मौजे आंबी येथील कंजार भट वस्ती परिसरातील ओढ्याच्या काठावर बेकायदेशीररित्या हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी महिला इ….. पुरुषोत्तम राठोड हिने दारू निर्मितीसाठी गुळ मिसळून तयार केलेले कच्चे रसायन साठवून ठेवले असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३००० लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन (अंदाजे ४ हजार लिटर क्षमतेच्या टाकीत) जप्त केले असून त्याची एकूण किंमत १,५४,००० रुपये असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, पोलिसांना पाहताच आरोपी महिला घटनास्थळावरून पळून गेली. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (क), (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
पुढील तपास पोलीस कर्मचारी शेख करीत असून अवैध दारू निर्मिती व विक्रीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.




