spot_img
spot_img
spot_img

वाकड परिसरातील नागरी समस्यांकडे लक्ष द्या ; विशाल वाकडकर यांची जनसंवाद सभेत मागणी

शबनम न्यूज | पिंपरी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जनसंवाद सभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, युवा नेते श्री. विशाल वाकडकर यांनी वाकड व परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत सखोल आणि ठोस मागण्या केल्या. सभेमध्ये श्री. विशाल वाकडकर यांनी खालील प्रमुख मुद्दे मांडले. 

पावसाळ्यापूर्व नाले व स्ट्रॉम वॉटर लाईन्सची स्वच्छता. वाकड आणि परिसरातील नैसर्गिक ओढ्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. सांडपाणी वाहणारे नाले व स्ट्रॉम वॉटर लाईन्समधील गाळ काढून पावसाळ्यापूर्वी साफसफाई करावी. यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे व पूरस्थिती टाळता येईल.

चिंधाजी भूमकर चौक परिसरातील वाहतूक सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, युरो स्कूल व रॉयल एन्ट्राडा सोसायटीसमोरील मुख्य रस्त्यावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) लावावेत. शाळेच्या आसपासच्या परिसरात वाहतुकीचा वेग नियंत्रित करणे आवश्यक.

वाकड, ताथवडे व पुनावळे भागातील धोकादायक वृक्ष व झाडांच्या फांद्याचे सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी तातडीने छाटाव्यात. हवामान बदल व वादळी वाऱ्यांमुळे दुर्घटना टाळण्यासाठी वेळेवर उपाययोजना कराव्यात.

जय माता दी हॉटेल (भूमकर चौक, वाकड) परिसरात सध्या ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाइन निकृष्ट अवस्थेत आहे. येथे नवीन ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईन्स टाकाव्यात आणि पाणी तुंबण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी.

पारखे वस्ती येथील ओढ्याच्या आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये डास प्रतिबंधक धूर फवारणी करावी. डेंग्यू आणि इतर आजारांपासून संरक्षणासाठी डास प्रतिबंधक औषधांची फवारणी तातडीने करावी.

चिंधाजी भूमकर चौक ते वाकड हिंजवडी नवीन लिंक रोड दरम्यान अनेक ठिकाणी विद्युत पथदिवे बंद आहेत. सर्व पथदिव्यांची तातडीने तपासणी व दुरुस्ती करावी. रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रकाश व्यवस्था सुधारावी.

वाकड, ताथवडे, पुनावळे या जलदगतीने विकसित होणाऱ्या परिसरातील नागरी सोयीसुविधांमध्ये वाढ होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करून त्यांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा करावी.

श्री. विशाल वाकडकर यांनी सांगितले की, या सर्व मागण्यांसाठी ते मनपाशी सातत्याने पाठपुरावा करणार असून, नागरिकांच्या हितासाठी सदैव संघर्ष करतील.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!