spot_img
spot_img
spot_img

मराठी भाषेचे संवर्धन करून तरुणांना साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार – योगेश सोमण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 कला, साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या ‘कलारंग’ सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत नवनिर्वाचित ठरलेल्या पदाधिकाऱ्यांचा आणि सहकाऱ्यांचा ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ शुक्रवार ०३ एप्रिल रोजी निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. योगेशजी सोमण, प्रमुख कार्यवाह मा. स्वातीताई महाळंक आणि कोषाध्यक्ष मा. श्री. प्रदीप निफाडकर यांचा तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, अंजली कुलकर्णी, प्रसाद मिरासदार, माधव राजगुरु, डॉ. नितीन संगमनेरकर, डॉ. आशुतोष जावडेकर, राजन लाखे, पुरुषोत्तम काळे आणि प्रभाकर ओव्हाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

दिग्गजांची उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री, ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. गिरीशजी प्रभुणे तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

१०० व्या साहित्य संमेलनासाठी पिंपरी चिंचवड सज्ज – आमदार अमित गोरखे
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक व साहित्य वैभवात भर टाकणारी महत्त्वाची अपेक्षा व्यक्त केली. आगामी १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पिंपरी-चिंचवड शहरात व्हावे, अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. शहराची क्षमता आणि येथील साहित्यप्रेमींचा उत्साह लक्षात घेता, हे ऐतिहासिक संमेलन आयोजित करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.आमदार अमित गोरखे म्हणाले की, साहित्यिक हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. अशा विद्वान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे हे आमचे भाग्य असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या साहित्य व सांस्कृतिक चळवळीला यामुळे नवी ऊर्जा मिळेल.

भाषेचे संवर्धन आणि तरुणांना साहित्याशी जोडणार – योगेश सोमण
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या समृद्ध वारशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, ११९ वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना एक प्रकारचे दडपण आहे, जे मी नाकारणार नाही. आज माझ्यावर सोपवण्यात आलेली ही जबाबदारी मी अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे. ही वाटचाल मला अधिक सक्षम आणि तितक्याच सावधपणे करायची आहे. ज्यावेळी मी १ तारखेला या पदाचा कार्यभार स्वीकारला आणि खुर्चीवर बसलो, त्याच क्षणी मला या कर्तव्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. ही केवळ फिरणारी एक साधी खुर्ची नाही, तर १६,९०० हून अधिक सदस्यांच्या नजरा या खुर्चीकडे आशेने लागलेल्या आहेत. त्या प्रत्येक सदस्याला आपण उत्तरदायी आहोत. येत्या पाच वर्षांत आपण जी दिशा ठरवणार आहोत आणि ज्या पद्धतीने काम करणार आहोत, त्यात या सर्वांचा सहभाग कसा राहील, हे पाहणे ही माझी प्राथमिक जबाबदारी असेल. हे पद म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीच्या विचारशक्तीचे किंवा कल्पनेचे फळ नाही; तर हे अनेकांच्या इच्छाशक्तीचे, अफाट परिश्रमांचे आणि सामुहिक कष्टांचे प्रतीक आहे.या कार्यकारिणीचा प्रत्येक निर्णय हा सर्वसमावेशक असेल, याची मला संपूर्ण जाणीव आहे आणि हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी पूर्णतः कटिबद्ध आहे. पुढील काळात भाषेचे संवर्धन आणि साहित्याची गोडी जनमानसात निर्माण करण्यासाठी आम्ही एक वर्षाचे सूक्ष्म नियोजन करणार आहोत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या, ज्याची नोंद घेणे आवश्यक वाटते. पहिले म्हणजे, आजवरच्या ९९ संमेलन अध्यक्षांपैकी २५ अध्यक्ष हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राहिले आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. मात्र, दुसरीकडे एक गोष्ट मनाला खटकली, ती म्हणजे या ९९ अध्यक्षांमध्ये महिला अध्यक्षांची संख्या केवळ ७ आहे. ही दरी नक्कीच विचार करायला लावणारी आहे.  

मराठी भाषेचे संवर्धन आणि साहित्याची गोडी जनसामान्यात निर्माण करणे, हे आमचं मुख्य उद्दिष्ट असेल. शंभराव्या साहित्य संमेलनानंतर अनेक गोष्टी घडतीलच, पण मला ‘शाश्वत कामावर’ भर द्यायचा आहे. साहित्याची ही पालखी उद्या तरुणांच्याच खांद्यावर जाणार आहे. आजचे जे ३०-३५ वयोगटातील तरुण आहेत, जे काही कारणास्तव मराठी साहित्यापासून थोडे दुरावले आहेत, त्यांना पुन्हा वाचनाकडे वळवणे आणि त्यांच्या मनात मराठी भाषेबद्दलची गोडी निर्माण करणे, हे प्राधान्य असेल. यासाठी ‘अभिवाचन’ सारख्या कार्यशाळा सुरू करण्याचा आमचा मानस आहे.तरुणांच्या माध्यमातूनच मराठी भाषेचा हा वारसा आपण सक्षमपणे पुढे नेऊ शकतो. साहित्य परिषद ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिनाभरात कामाची ठोस दिशा निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

साहित्यातून भारतीय अस्मितेचा जागर व्हावा – गिरीश प्रभुणे
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे गिरीश प्रभुणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत नवनिर्वाचित कार्यकारिणीला मार्गदर्शन केले. परिषदेचे वातावरण आता शुद्ध झाले असून, नीट काम करायचे ठरवले तर पाच वर्षांचा काळही अपुरा पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वी केवळ ‘वैचारिक अड्डा’ बनलेल्या या ठिकाणी आता साहित्यिक उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीयत्वाच्या मूळ अस्मितेशी आणि स्वभावाशी जुळणारा प्रवाह आता सुरू झाला असून, ज्याप्रमाणे ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ आणि चोखोबा या संतांनी एकत्रितपणे अभंग-ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे विचार मांडले, तोच विचार पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  

सांस्कृतिक मेजवानी
‘कलारंग’ संस्थेचे अध्यक्ष आमदार अमित गोरखे, उपाध्यक्ष शैलेश लेले, सदस्य आशा नेगी आणि संजना मगर ,राम गायकवाड,प्रवीण पोळ,मुकुंद वेदपाठक यांच्या नियोजनाखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे निवेदन रविंद्र खरे यांनी केले. यावेळी संयोजन समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते. कला आणि साहित्याचा हा अनोखा त्रिवेणी संगम अनुभवताना उपस्थित नागरिक भारावून गेले होते. संयोगिता खुडे यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!