शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी युनूस खतीब)
निगडी येथील इंदिरानगर सेक्टर क्रमांक २२ मधील अन्वर मुक्तार अन्सारी यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी अधिकृत निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिव्यांग क्रिकेट नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या निवडपत्रानुसार, भारतीय संघ ३० एप्रिल २०२६ रोजी कोलंबो (श्रीलंका) येथे रवाना होणार आहे. या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात संघ १ ते ३ मे दरम्यान तीन टी-२० सामने खेळणार असून, ४ ते ६ मे दरम्यान कसोटी सामने होणार आहेत.
अन्वर अन्सारी यांच्या मागील स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर निवड समितीने त्यांची प्रमुख खेळाडू म्हणून निवड केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रदर्शन, मेहनत आणि संघासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना ही संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, हा दौरा स्वखर्चाने आयोजित करण्यात आला असून, निवड झालेल्या खेळाडूंना खर्चाची रक्कम मंडळाच्या अधिकृत खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात प्रायोजकत्व उपलब्ध झाल्यास संबंधित खर्च समायोजित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अन्वर अन्सारी यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.



