पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
चाकण परिसरात बांधकाम साईटवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास वैदवस्ती, बालाजी नगर, मेदनकरवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी रितलाल झाबुल महतो (वय ६०) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी कॉन्ट्रॅक्टर आरविंद शारवाले (रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी) याने आपल्या मालकीच्या बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षेकडे गंभीर दुर्लक्ष केल्याचे तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौथ्या मजल्यावर उंचीवर बांधकाम सुरू असताना कामगारांना आवश्यक असलेली सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, झुला किंवा इतर सुरक्षासाधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे काम करत असताना कामगार ननचंद नेहाल महतो (वय ४६) याचा तोल जाऊन स्लॅब तुटल्याने तो थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला.
या अपघातात त्याच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कॉन्ट्रॅक्टरला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धायगुडे करत आहेत.



