पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
चाकण परिसरातील एका स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईत एक आरोपी ताब्यात घेतला आहे, तर मुख्य आरोपी फरार झाला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.५७ वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील मुटकेवाडी येथील साई कॉर्पोरेट बिल्डिंगमधील ‘7 Star Family Spa’ येथे छापा टाकण्यात आला.
या प्रकरणी गजानन बाळासाहेब सूर्यवंशी (वय ४४) याला मुख्य आरोपी म्हणून निष्पन्न करण्यात आले असून तो सध्या फरार आहे. तसेच मोहन भानुदास तिस्तक (वय अंदाजे ४०) याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
तपासादरम्यान आरोपी सूर्यवंशी हा स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसायास प्रवृत्त करत असल्याचे उघड झाले. पीडित महिलेचा वापर करून ग्राहकांकडून पैसे उकळले जात होते आणि त्यातून आरोपी स्वतःची उपजीविका करत होता.
विशेष म्हणजे, संबंधित स्पा सेंटर हे सार्वजनिक ठिकाणी—हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटरच्या शेजारी—असतानाही आरोपींनी बिनधास्तपणे हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू ठेवला होता. तसेच दुसऱ्या आरोपीने या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ (२), ३ (५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सोळंके करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.



