spot_img
spot_img
spot_img

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली २०.५८ लाखांची फसवणूक; रावेतमध्ये गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल २० लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रावेत परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सन २०२१ पासून ते आतापर्यंत मुकाई चौक परिसरातील लेगसी फॉर्च्युन एक्झॉटिका सोसायटी येथे घडली. याप्रकरणी विवेक जगदेवराव शिंदे (सध्या पत्ता अज्ञात) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपीने फिर्यादी महिलेशी संपर्क साधत शेअर मार्केटमधून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आरोपीने फिर्यादीकडून डिमॅट खाते उघडून घेतले. मात्र, अपेक्षित नफा न मिळाल्याने आरोपीने वेगळी युक्ती लढवत “तुम्ही थेट मला पैसे द्या, मी माझ्या डिमॅट खात्यात गुंतवणूक करून तुम्हाला नफा देतो,” असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

विश्वासात घेऊन आरोपीने वेळोवेळी विविध माध्यमांतून पैसे स्वीकारले. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपीने फिर्यादीची एकूण ₹२०,५८,०००/- इतकी फसवणूक केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ (१), ३१८ (२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिळे करत आहेत.

नागरिकांनी घ्यावी काळजी
ऑनलाईन गुंतवणूक किंवा शेअर मार्केटमधील आकर्षक ऑफर्सवर लगेच विश्वास ठेवू नये. ओळखीशिवाय कोणालाही पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!