spot_img
spot_img
spot_img

शेअर मार्केटच्या आमिषाने १५.९१ लाखांची ऑनलाईन फसवणूक; निगडी पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने मोठ्या आर्थिक फसवणुकीची घटना उघडकीस आली असून, एका महिलेची तब्बल १५ लाख ९१ हजार ५० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २२ सप्टेंबर २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चिंचवड स्टेशन परिसरातील प्रशांत रेसिडेन्सी येथे घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपींसह किर्ताना बंगेरा नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

फिर्यादी महिलेला फेसबुकवर शेअर मार्केट संदर्भातील एक लिंक दिसली. त्या लिंकवर क्लिक करताच आरोपींनी तिला संपर्क साधत “सॅमको एफर्टलेस ट्रेडिंग” नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील केले. त्यानंतर आरोपींनी स्वतःला गुंतवणूक तज्ञ म्हणून सादर करत ऑनलाईन शेअर खरेदी-विक्रीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

विश्वास बसावा यासाठी सुरुवातीला काही बनावट व्यवहार दाखवून फिर्यादीला अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादीने वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर केली. मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता आरोपींनी संपर्क तोडला.

या प्रकारात फिर्यादीची एकूण ₹१५,९१,०५०/- इतकी आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

नागरिकांसाठी आवाहन
सोशल मीडियावरील अनोळखी लिंक, गुंतवणुकीचे आकर्षक ऑफर किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपच्या आमंत्रणांपासून सावध राहावे. खात्रीशीर माहितीशिवाय कोणतीही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!