पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
जुनी सांगवी परिसरात निष्काळजीपणामुळे एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात उघडी ठेवलेली पाण्याची टाकी एका निरागस जीवावर बेतली असून, या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
ही घटना दि. ३१ मार्च २०२६ रोजी रात्री ८ ते ११ वाजण्याच्या दरम्यान दत्त मंदिर परिसर, पवनानगर लेन क्रमांक १, जुनी सांगवी येथे घडली. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात दि. १ एप्रिल रोजी पहाटे ४:४८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
मृत चिमुकलीचे नाव कु. प्रियंका मनोज विश्वकर्मा (वय ३ वर्षे ९ महिने) असे असून, ती खेळत असताना उघड्या पाण्याच्या टाकीत पडली. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकामाच्या ठिकाणी असलेली पाण्याची टाकी कोणत्याही झाकणाशिवाय व सुरक्षाव्यवस्था न करता उघडी ठेवण्यात आली होती. अशा प्रकारे गंभीर धोका संभवत असल्याची जाणीव असूनही आरोपींनी आवश्यक ती खबरदारी घेतली नाही.
या प्रकरणी मनिष बाबासाहेब पवार, कॉन्ट्रॅक्टर जयराम बबनराव कांबळे आणि वसंत कैलास बनसोडे या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर बीएनएस कलम १०५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बांधकाम ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.



