पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
चाकण परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेत एका मजुरावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना दि. १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास आरोग्यम हॉस्पिटलजवळ घडली. जखमी फिर्यादी रेवण केरबा कावळे (वय ४५, रा. रामनगर, चिंचवड) हे मजुरीचे काम करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, कावळे यांना त्यांच्या ओळखीतील व्यक्तीकडून हायटेक कंपनीत मशीन सेटिंगसाठी बोलावण्यात आले होते. मात्र कंपनीत वीज नसल्याने काम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर कावळे यांना केळकरनगर येथे सोडण्यात आले. तेथून पायी जात असताना आरोग्यम हॉस्पिटलजवळ दबा धरून बसलेल्या आरोपीने अचानक हल्ला चढवला.
जनार्धन तुकाराम पांचाळ (वय ५२, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर जोरदार वार केला. हल्ल्यावेळी फिर्यादीने बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या मनगटावर गंभीर जखम झाली. तसेच आरोपीने बरगडीवरही वार केले.
हल्ल्यादरम्यान आरोपीने परिसरातील नागरिकांनाही धमक्या दिल्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने कोयता उगारून त्यांच्यावरही धाव घेतल्याने लोकांनी तेथून पळ काढला व काही दुकानांनी शटर खाली केले.
या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम १०९, ३५२ तसेच क्रिमिनल अॅक्ट १९३२ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



