शबनम न्यूज | पुणे
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पसार असलेल्या तिसऱ्या आरोपीला अटक पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले. यापूर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) आणि अख्तर अली शेख (२८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) या दोघांना अटक केली होती. या प्रकरणातील तिसरा आरोपी हा फरार होता. अखेर त्याला वालचंदनगर पोलिसांच्या साहाय्याने पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले.
सूरज ऊर्फ बापू गोसावी (रा. भवानीनगर संसर, ता. इंदापूर, जि. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी गोसावीला रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
३ ऑक्टोबर २०२४ बोपदेव घाट परिसरात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या तपासासाठी पोलिसांनी बोपदेव घाटाच्या परिसरातील ४५ गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराईतांची चौकशी केली होती. आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेकडून ६० पथके तयार करण्यात आली होती. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी येवलेवाडी परिसरातून कनोजियाला अटक करण्यात आली होती. चौकशीत आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराज जवळील मूळगावी पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शेखला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली होती.